मुंबई : सध्या देशातील 155 दशलक्ष तरूण हे उच्च शिक्षण घेण्याच्या वयात आहेत; मात्र पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचा कल परदेशी विद्यापीठांकडे आहे. 2030पर्यंत उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्र असलेल्या तरुणांची संख्या 165 दशलक्षपर्यंत जाणार आहे.
डेलॉइट इंडिया आणि नाइट फ्रँक इंडिया यांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालात उच्च शिक्षण घेण्याच्या वयात असलेल्या तरुणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार, सध्या उच्च शिक्षणासाठी पात्र वयात असलेल्या 155 दशलक्ष तरूण लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी देशात पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतील व्हिसा निर्बंध कठोर असूनही तिकडे भारतीय तरुणांचा कल दिसून येतो.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झाल्यानंतर भारतातील उच्च शिक्षणाची परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. 18 जागतिक विद्यापीठांना तत्वत: किंवा अंतिम मान्यता मिळाली असून त्यापैकी 3 कार्यरत आहेत.
परदेशी विद्यापीठांच्या शाखा भारतात सुरू होत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मायदेशात शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील. 2040 पर्यंत भारतात परदेशी विद्यापीठे कार्यरत होतील व येथे 5 लाख 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील.
तब्बल 113 अब्ज परकीय चलनाची होणार बचत
परदेशी विद्यापीठांच्या शाखा भारतात सुरू झाल्यानंतर 113 अब्ज परकीय चलनाची बचत होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच उच्च शिक्षणाशी संबंधित मालमत्तांसाठी 19 दशलक्ष चौरस फुटांची विशेष मागणी निर्माण होईल. या अहवालात भारतातील 40 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार दिल्ली एनसीआर ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. त्यानंतर मुंबई आणि बंगळुरू या मोठ्या बाजारपेठा आहेत.