मुंबई : देशभरात निवासी मालमत्तांना असलेली मागणी 2025 सालात स्थिर राहिली. मात्र जुलै ते डिसेंबर या कालावधीत झालेली 1 लाख 78 हजार 406 घरांची विक्री ही 2013 नंतर दुसऱ्या सहामाहीत झालेली सर्वाधिक विक्री आहे.
देशातल्या 8 महत्त्वाच्या शहरांमध्ये पूर्ण 2025 या वर्षात 3 लाख 48 हजार 207 घरांची विक्री झाली. यात वार्षिक केवळ 1 टक्का वाढ दिसून आली. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 1 लाख 78 हजार 406 घरांची विक्री झाली.
दुसऱ्या सहामाहीतील गृहविक्रीचा विचार करता 2013नंतरची ही सर्वाधिक विक्री आहे. 2025 या वर्षात झालेल्या एकूण गृहविक्रीपैकी 29 टक्के वाटा मुंबईचा आहे. या काळात मुंबईतील 97 हजार 188 घरांची विक्री झाली. नाइट फ्रँक इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे.
मुंबईत 87 हजार 114 घरे नव्याने बाजारात उपलब्ध झाली. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी आहे. विक्री झालेल्या 97 हजार 188 घरांची एकूण किंमत 8 हजार 856 कोटी रुपये आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढ झाली. वर्षभरात विक्री झालेल्या घरांपैकी 50 हजार 153 घरांची विक्री ही जुलै ते डिसेंबर या कालावधीत झाली आहे.