Increase in number of corona patients in Mumbai
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला असल्याचे उघडकीस आले असून आता मुंबई महानगरपालिकेने मुंबईकर जनतेला आवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत देखरेख सुरु केली आहे. मे महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना घाबरू नका, परंतु काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुंबईतील रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाच्या उपचारासंदर्भात सर्वोत्तम सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये २० बेड आहेत. तसेच बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड ठेवण्यात आले आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात अतिदक्षता विभागात २ बेड आणि १० बेडचा वॉर्ड आहे. तसेच गरज पडल्यावर या रुग्णालयामधील क्षमता वाढवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पुन्हा कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, फेस मास्क वापरणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे यासारखी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.