Imtiaz Khatri Threat Case: इम्तियाज खत्री धमकी प्रकरणातील आरोपी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल असल्याचा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मोहम्मद शरीफ चौकशी सुरू आहे. त्याने दहशतवादी संघटनांसाठी स्लीपर सेल म्हणून काम केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या धमकी प्रकरणी शरीफ यांना अटक करण्यात आली होती. आरोपी शरीफ मुंबईत काही दिवस गरीब नगर परिसरात वास्तव्यास देखील होता. मात्र त्याचा सर्वाधिक वावर हा जोगेश्वरी परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे.
तपास यंत्रणांना तो पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचा संशय आहे. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाइलमधून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मोबाइल नंबर आणि चॅट्स मिळाले आहेत.
अटकेपूर्वी आरोपीने मोबाइलमधील नंबर आणि एन्क्रिप्टेड चॅट्स डिलीट केल्याचं समोर आले आहे. फॉरेन्सिक तपासासाठी आरोपी आणि त्याच्या पत्नीचे मोबाइल एफएसएलकडे पाठवले आहेत. डिजिटल रिकव्हरी टूल्स आणि सायबर तंत्राच्या मदतीने डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिकव्हर झालेल्या डेटामधून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नावं आणि नेटवर्कचा तपास होण्याची शक्यता आहे. शरीफची पत्नीही संशयाच्या भोवऱ्यात असून पतीच्या राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये मदत केल्याचा संशय तिच्यावर आहे. आर्थिक व्यवहार आणि कोडवर्ड्सच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
शरीफ आणि त्याच्या पत्नीचे बँक खाते, यूपीआय पेमेंट्स आणि परदेशी फंडिंगच्या संशयास्पद स्रोतांची चौकशी करण्यात येत आहे. दोघांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचं बारकाईने विश्लेषण सुरू आहे. विशेष तांत्रिक पथकाकडून मोबाइल आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात आहे.
शरीफच्या वडील आणि एका भावाचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचीही माहिती तपासात समोर आलं आहे असा दावा पोलिसांनी केला आहे. अटक होताच पोलिसांनी आरोपीच्या हँडसेटमधील संवेदनशील चॅट्स, कॉल लॉग्स, व्हॉइस नोट्स, डिलीट केलेला डेटा रिकव्हर करून पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न करत आहेत.