वाशी : नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच मतदारांना खुश करण्यासाठी काही माजी नगरसेवकांनी विविध हातखंडे वापरायला सुरुवात केली आहे. त्यातीलच एक बाब म्हणजे मतदारांना अनधिकृत फेरीवर व्यवसाय लावण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याची बाब तुर्भे परिसरात घडली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते पदपथ पादचारी पूल यांसह अन्य ठिकाणी फेरीवाल्यांनी त्यांचे बस्थान मांडले आहे. परिणामी पादचाऱ्यांना रस्ते व पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. अशा स्थितीतच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या माजी नगरसेवकांकडून निवडणुकीच्या काळात मतदारांना विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. यामध्ये मतदारांना फिरायला घेऊन जाणे, त्यांना पार्ट्या देणे यांसह अन्य प्रकार चालू झाले आहेत. तुर्भे येथील एका माजी नगरसेविकेने चक्क मतदारांना रस्ते, पदपथ काबीज करून अनधिकृत व्यवसाय चालू करा असे फर्मान सोडले आहे.
तुर्भे सेक्टर 20, 21, एपीएमसी बाहेरील रस्ते येथे हे फेरीवाले बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातील तुर्भे, एपीएमसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांची संख्या अचानक वाढली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक फेरीवाल्यांकडे महापालिकेचा परवाना नाही. तसेच याठिकाणी उघड्यावर खाद्यान्न शिजवले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी लोकप्रतिनिधी अनधिकृत फेरीवाल्यांना फूस लावत असल्याचे पाहून काही दबंगगिरी करणाऱ्या बोगस समाजसेवकांनीही त्यांचे अनधिकृत फेरीवाले बसवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी विभाग कार्यालयामध्ये तक्रार करूनही त्यावर कारवाई केली जात नाही असे समजते. विभाग कार्यालयातील अधिकारी या लोकप्रतिनिधींपुढे हदबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याचाच गैरफायदा विभाग कार्यालयातील काही कर्मचारीही घेत असल्याची चर्चा आहे. फेरीवाल्यांची संख्या वाढवण्यामध्ये यांचाही हातभार लागत असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या अगोदर बऱ्याचदा त्यांना त्याची माहिती दिली जाते. ही माहिती मिळतात त्या दिवशी संबंधित फेरीवाले आपला व्यवसाय बंद करत असल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून माजी लोकप्रतिनिधी, दबंगगिरी करणारे बोगस समाजसेवक, झारीतील शुक्राचार्य असलेले महापालिका कर्मचारी यांना वेळीच वाठणीवर आणण्यासाठी धडक कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी केली जात आहे.