मुंबईकरांना मिळणार क्षणार्धात पावसाची माहिती Pudhari Photo
मुंबई

आयआयटीचे ‘Mumbai Flood App’ देणार मुंबईकरांना क्षणार्धात पावसाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाचे प्रमाण वाढले की मुंबईकरांना घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. मात्र, नेमका पावसाचा अंदाज येत नाही आणि नेमकी माहिती कळत नाही. आता ही मुंबईकरांची चिंता मिटणार आहे. मुंबईतील पावसाची सद्यस्थिती, पुढील काही तासांमधील पावसाचा अंदाज, पाणी भरण्याची ठिकाणे आणि तेथील स्थिती याबाबतची तंतोतंत माहिती अॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे. आयआयटी मुंबईने खास मुंबईकरांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने ‘मुंबई फ्लड ॲप’ नावाचे ॲप तयार केले आहे.

आयआयटीने बनवलेले हे अॅप केवळ मोबाईलवर नव्हे तर विशेष म्हणजे वेब पोर्टलच्या माध्यमातही उपलब्ध आहे. या ॲपवर पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येईल. त्यासाठी क्लायमेट स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी विशेष मॉडेल तयार केले आहे. त्याशिवाय मिठी नदी, वाकोला नाला अशा ठिकाणी बसवलेल्या सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची पातळीही कळणार आहे. तसेच या ॲपमध्ये नागरिकही त्यांच्या भागातील माहिती टाकू शकतील. ही माहिती इतरांना पाहता येईल.

या फिचरच्या मदतीने विविध ठिकाणची अधिकाधिक माहिती उपलब्ध होणार आहे. वेब पोर्टलवर वापरणाऱ्यांना प्रत्यक्ष त्या वेळी स्थानिक हवामान केंद्रांजवळ पडणाऱ्या पावसाची माहिती घेता येईल. तसेच मुंबईच्या पावसाबद्दल व पुराबद्दल ‘एक्स’ या सोशल मीडिया ॲपवर आलेले मेसेजही बघता येणार आहेत. त्यासाठी https://mumbaiflood.in/ या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असून ‘मुंबई फ्लड ॲप’ या नावाने गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे.

आयआयटी मुंबईच्या क्लायमेट स्टडीज आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्री अभ्यासक्रमाच्या मुलांनी एकत्र येत हे ॲप तयार केले आहे. त्यासाठी त्यांना एचई-आयआयटीबी इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून आणि एचडीएफसी एर्गोचे सहकार्य मिळाले आहे. प्रा. रघू मूर्तुगुड्डे आणि डॉ. सुबिमल घोष यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. अशी माहिती आयआयटीकडून देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT