IIT Bombay Protest Pudhari
मुंबई

IIT Bombay Protest: आयआयटी मुंबईत आंदोलन सुरूच! विद्यार्थ्यांत दोन गट; प्रवेशद्वारावर ४० विद्यार्थ्यांचा ठिय्या

मुख्य प्रवेशद्वारावर ३० ते ४० विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; आंदोलनासोबत वर्ग आणि शैक्षणिक कामकाजातही सहभाग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन मंगळवारीही सुरूच राहिले. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनासोबतच विद्यार्थी नियमित वर्ग आणि शैक्षणिक कामकाजातही सहभागी होत आहेत.

या विद्यार्थ्यांच्या विविध गटांच्या भूमिकांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका गटाने संस्थेच्या भूमिकेला पाठिंबा देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे, तर मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

विद्यार्थी प्रतिनिधींच्या एका गटाने आंदोलनाचा अर्थ गैरप्रकार किंवा कॉपीला समर्थन असा घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना कॉपीचे समर्थन नसून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संस्थेतील कार्यपद्धती आणि प्रक्रियांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक बदल करावेत, या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आल्याचे या गटाने म्हटले आहे. संचालक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या खुल्या संवादाचेही या गटाने स्वागत केले आहे.

प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला दोषी आहेत किंवा नाहीत, याचा निर्णय निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीतून व्हावा, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत दुल्ला यांना प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून, विशेषतः अधिष्ठाता प्रशासन पदापासून दूर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बाहेरील राजकीय किंवा अन्य संघटनांचा प्रभाव पडू नये आणि हे प्रश्न संस्थेच्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सोडवावेत, अशी भूमिकाही मांडण्यात आली आहे.

दुसरीकडे, मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत दुल्ला यांना अध्यापनासह संस्थेतील सर्व जबाबदाऱ्यांपासून निलंबित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी व्यवहाराचे अधिष्ठाता असताना त्यांनी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

या प्रकरणाची बाह्य संस्थेमार्फत चौकशी करावी आणि ऊर्जा विज्ञान विभागातील कोणत्याही सदस्याचा चौकशीमध्ये समावेश करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी शिस्तभंग कारवाई समितीच्या कार्यवाहीची आणि अहवालाची अनामिक स्वरूपातील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. समितीच्या कार्यवाहीत विद्यार्थ्यांना समान प्रतिनिधित्व द्यावे, तसेच शिक्षेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हकालपट्टी करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विद्यार्थी कल्याण समितीने स्वतंत्रपणे काम करावे आणि विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता हे वैद्यकीय पात्रता असलेले व्यावसायिक असावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

माजी विद्यार्थ्यांकडून निष्पक्ष चौकशीचे आवाहन

आयआयटी मुंबई माजी विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि आधार देणारे वातावरण संस्थेत असावे, असे संघटनेने म्हटले आहे.

प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी व्यक्तींविरोधात अंदाज, माध्यमीन खटले किंवा निष्कर्ष काढणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पॅनआयआयटी अल्युम्नी इंडियानेही घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आयआयटी परिसर शिक्षण, परस्पर आदर आणि सामूहिक उद्देशाचे केंद्र राहावे, यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासन आणि माजी विद्यार्थ्यांनी रचनात्मक संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले. कॅम्पसमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळून आयआयटी व्यवस्थेच्या बळकटीसाठी सर्वांनी एकत्र काम करावे, अशी भूमिकाही संघटनेने मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT