IIT Mumbai Pudhari News Network
मुंबई

IIT Mumbai AI Research Center: आयआयटी मुंबईत होणार संशोधन केंद्र!

उत्पादन क्षेत्रांतील अडचणींवर सहकार्याने तंत्रज्ञान विकास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशातील उत्पादन क्षेत्र अधिक सक्षम, अचूक आणि आधुनिक बनवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेच्या साहाय्याने संशोधन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आयआयटी मुंबई आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने उत्पादन तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

लघु व मध्यम उद्योग, नवउद्योजक आणि नव्या उद्योगसंस्थांनाही या संशोधनाचा थेट लाभ मिळावा, यासाठी उद्योगांशी समन्वय साधून प्रत्यक्ष प्रकल्प राबवले जाणार आहेत. उत्पादन नियोजन, साठा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि कामगार सुरक्षेसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या केंद्रामधून कारखान्यांतील प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, संगणकीय विश्लेषण आणि स्वयंचलित यंत्रणा यांचा वापर करून उपाय विकसित केले जाणार आहेत. उत्पादनाचा वेग वाढवणे, यंत्रसामग्रीतील बिघाड आधीच ओळखणे, दर्जा सुधारणा करणे आणि खर्च कमी करणे यावर संशोधन केंद्राचा भर राहणार आहे.

या उपक्रमाची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी दोन्ही संस्थांदरम्यान सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या सहकार्यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थी व संशोधकांना जागतिक पातळीवरील तांत्रिक अनुभव मिळणार असून, उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी, देशातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्याची स्पर्धात्मकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

भारतीय उद्योग अधिक सक्षम होतील : शिरीष केदारे

उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित संशोधन करून उत्पादन प्रक्रियेत ठोस सुधारणा घडवून आणणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून भारतीय उद्योग अधिक सक्षम व आत्मनिर्भर होतील, असे आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT