Banjara Reservation Pudhari
मुंबई

Banjara Demands ST status: बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटमध्ये काय उल्लेख आहे, सध्या कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मिळते?

Dhananjay Munde On Banjara Reservation: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; मागणी मान्य न झाल्यास समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Banjara Reservation ST Status Demand Hyderabad Gazette

मुंबई : हैदराबाद राजपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच आता याच हैदराबाद गॅझेटला प्रमाण मानून राज्यातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, जालना, बुलढाणा, जळगाव आणि बीड अशा किमान सात जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोर्चा काढला होता. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून न्यायालयात जाण्याचा इशाराही बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ही मागणी नेमकी का केली जातेय, कोणकोणत्या नेत्यांनी ही मागणी केली आहे , सध्या बंजारा समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मिळते हे जाणून घेऊया पुढारी विश्लेषणातून....

धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

हैदराबाद गॅझेटला प्रमाण मानून राज्यातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र शुक्रवारी (दि. १२) माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. तत्पूर्वी, सोमवार बीड येथे याच मागणीसाठी करण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित सहभागी झाले होते.

बंजारा समाजाला सध्या ३ टक्के आरक्षण

बंजारा समाजाला पारंपरिकपणे विमुक्त जाती (विजे) किंवा विमुक्त जमाती म्हणून ओळखले जाते. सध्या या समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात तीन टक्के आरक्षण आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या लोकांना ७% आरक्षण मिळते. राज्यात बंजारा समाजाच्या लोकसंख्येतील टक्का सुमारे १ इतकाच आहे. आता बंजारा समाजाची मागणी मान्य झाल्यास त्यांच्या आरक्षणात चार टक्क्यांची वाढ होऊ शकते.

हैदराबाद राजपत्रात बंजारा समाजाचा काय उल्लेख आहे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, मराठवाडा प्रदेश १९४८ पर्यंत निजामशासित हैदराबाद राज्याचा भाग होता. १९२० च्या हैदराबाद राजपत्रात, लंबाडा/बंजारा (सुगडी) समुदायाचा स्पष्टपणे अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख आहे. या ऐतिहासिक आणि प्रशासकीय नोंदींवरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्रातील बंजारा समुदायाला आदिवासी (Scheduled Tribe) समुदायाचा भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे.तथापि, १९५६ मध्ये मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश झाला. यानंतर या समाजाचा ओबीसी/एनटीसी श्रेणीत समावेश करण्यात आला.

आता बंजारा समाजाची मागणी काय आहे?

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार आता मराठ्यांना ओबीसी म्हणून कोट्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे बंजारा समुदायालाही अनुसूचित जमाती श्रेणीत समाविष्ट करून या श्रेणीत आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

आंध्रात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले आहे. 1956 मध्ये द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली त्यावेळीही बंजारा समाज महाराष्ट्रात यायला तयार नव्हता. कारण तिथे बंजारा समाजाला सवलती मिळत होत्या. तेव्हा बंजारा समाजाची मागणी होती की आम्हाला तिथेच राहू द्या. मराठवाड्यात एकाही खासदाराने बंजारा समाजाविना निवडणूक लढवून दाखवावी आणि विजय होऊन दाखवावं. मराठवाड्यात एका खासदाराने बंजारा समाजा विना निवडणूक लढवून दाखवावी आणि विजय होऊन दाखवावं. मराठा समाजापेक्षा मोठी ताकद बंजारा समाजाची आहे.
हरीभाऊ राठोड
बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे हे खरे आहे. समाजाला एकमेकांसमोर उभे केले जात आहे. सत्ताधारीच हे घडवून आणत आहे.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस

धनगर बांधवांचीही एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी

महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून धनगर बांधव एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करत आहेत. सध्या हा समाज भटक्या जमाती (एन.टी.) प्रवर्गात आहे. या अंतर्गत नोकरी आणि शिक्षणात ३.५ टक्के आरक्षण मिळते. धनगर बांधवांचा एसटी प्रवर्गात समावेश झाल्यास त्यांचा आरक्षणाचा टक्का वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT