मुंबई : निरोगी शरीरासाठी एका दिवसात 3 ते 4 चमचे रिफाइंड तेलाचे सेवन करता येऊ शकते. मात्र, दिवसाला 20 ग्रॅमपेक्षा जास्त तेल वापरल्यास ते शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते.
अति तेलकट आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकारांचा धोका वाढत असल्याचा इशारा मुंबईतील डॉक्टरांनी दिला आहे. दिवसाला मर्यादित प्रमाणातच तेलाचे सेवन करावे, असे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. डॉक्टरांच्या मते, शरीराला मर्यादित प्रमाणात चांगल्या फॅटची आवश्यकता असते. शरीरातील पेशींच्या बाहेरील आवरणासाठी तसेच काही जीवनसत्त्वांच्या शोषणासाठी तेल आवश्यक असते. ओमेगा-3सारखे आवश्यक फॅटी ॲसिड शरीर स्वतः तयार करू शकत नसल्याने ते आहारातून घेणे गरजेचे असते.
केईएम रुग्णालय येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. चरण लांजेवार यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या तेलाचे अति सेवन घातक ठरू शकते. शेंगदाणा, मोहरी किंवा सूर्यफूल तेल असो, प्रमाण मर्यादित असणे महत्त्वाचे आहे.
दीर्घकाळ एकाच प्रकारचे तेल वापरण्याऐवजी वेळोवेळी तेल बदलणे किंवा मिश्रित स्वरूपात वापरणे अधिक फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या तेलांमध्ये प्रकारचे फॅटी ॲसिड आणि पोषक घटक असतात. मोहरीच्या तेलात ओमेगा-3 आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट अधिक असते, सूर्यफूल तेलात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते.
पाम तेल आणि वनस्पती ‘तूप टाळण्याचा सल्ला
डॉक्टरांनी पाम तेल आणि वनस्पती तूपापासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि धमन्यांमध्ये ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो.
एका ग्रॅम तेलामध्ये सुमारे 9 कॅलरी असतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण वाढल्यास वजन झपाट्याने वाढते. शरीरात अतिरिक्त चरबी साचल्याने फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. तसेच धमन्यांमध्ये चरबी जमा झाल्यास हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि ब्लॉकेजचा धोका वाढतो. तेलाचे अति सेवन इन्सुलिनच्या कार्यावरही परिणाम करत असल्याने मधुमेहाची शक्यता वाढते.डॉ. आकाश शुक्ला, हेपॅटोलॉजी विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय