पुढारी वृत्तसेवा
अलीकडच्या काळात दिसायला तंदुरुस्त आणि फिट वाटणारे लोकही अचानक हार्ट अटॅकचे बळी ठरताना दिसत आहेत. यामागील एक मोठे कारण म्हणजे लपलेली हृदयविकाराची लक्षणे ही आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते जिम जॉइन करण्यापूर्वी किंवा कोणत्याही शारीरिक कसरतीचा व्यायाम सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीर उच्च-तीव्रतेच्या व्यायामासाठी कितपत तयार आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
डॉक्टरांच्या मते, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास जिम किंवा हेवी वर्कआउट सुरू करताना या चाचण्या नक्की करून घ्याव्यात.
ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) या चाचणीत हृदयाच्या ठोक्यांचे आणि इलेक्ट्रिकल सिग्नलचे रेकॉर्डिंग केले जाते. धडधडीत अनियमितता, ब्लॉकेज किंवा जुन्या हार्ट अटॅकचे संकेत शोधण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते.
ट्रेडमिल टेस्ट / स्ट्रेस टेस्ट चाचणीद्वारे व्यायामदरम्यान हृदय कशाप्रकारे कार्य करते, याचे मूल्यांकन केले जाते. उच्च-तीव्रतेच्या व्यायामादरम्यान उद्भवू शकणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्यांचा अंदाज यातून घेतला जाऊ शकतो.
लिपिड प्रोफाइल + HbA1c : लिपिड प्रोफाइलद्वारे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कळते, तर HbA1c चाचणी मागील तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची पातळी दर्शवते. या दोन्ही चाचण्यांमुळे डायबिटीज, प्रीडायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या स्थितींचा शोध लागतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
Hs-CRP चाचणी शरीरातील सूज किती आहे याचा अंदाज घेण्यास मदत करते. ही सूज धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्याचे कारण ठरू शकते आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, अगदी तुमचे कोलेस्ट्रॉल प्रमाण सामान्य असले तरीही.
लक्षात ठेवा या चाचण्या अत्यावश्यक हेल्थ चेकअप आहेत. वेळेवर केलेल्या या तपासण्यांमुळे हृदयाशी संबंधित गंभीर समस्या लवकर ओळखण्यास मदत होते.