मनसे नेते संदीप देशपांडे  File Photo
मुंबई

Maharashtra politics : मनसे नेते संदीप देशपांडेचं वादग्रस्‍त विधान, एका शब्‍दामुळे सत्ताधारी आक्रमक

षंढ या शब्दावरून हक्क भंग आणू : मंत्री गुलाबराव पाटील यांचा मनसेला इशारा

पुढारी वृत्तसेवा

संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधान भवनात लोकसभेने आज (दि. २३ जून) एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेत नसल्‍याचे पाहून मनसे नेते ( MNS leader) संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला. “हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विधान भवनात सगळे षंढ बसले आहेत. हे पाहून मराठी माणसाने काय करायचं”, अशी बोचरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. त्‍यांनी वापरलेल्‍या षंढ या शब्दावरून आता राजकारण सुरू झालं आहे. भाषा समजण्यासाठी तुम्हाला निवडून यावं लागेल, अशी खोचक टीका नीलम गोर्‍हे यांनी केली. तर षंढ या शब्दावरून हक्क भंग आणू, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेला दिला आहे. यावर आपण व्यक्ती बद्दल नाही तर प्रवृत्ती बद्दल बोललो होता, असा खुलासा संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच माझा शब्द चुकला असेल; पण तुम्ही विचार करा. मी मराठी भाषेसाठी काेणत्‍याही कारवाईला सामाेरे जाईन, असा निर्धार त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

संदीप देशपांडे नेमकं काय म्‍हणाले?

संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधान भवनात लोकसभेने आज (दि. २३ जून) एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेत नसल्‍याचे पाहून मनसे नेते ( MNS leader) संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला. “हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विधान भवनात सगळे षंढ बसले आहेत. हे पाहून मराठी माणसाने काय करायचं”, अशी बोचरी टीका त्‍यांनी केली.

षंढ शब्दावरून हक्क भंग आणू : गुलाबराव पाटील यांचा मनसेला इशारा

संदीप देशपांडे यांनी राज्‍य सरकारवर केलेल्‍या बोचर्‍या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेला इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांनी महाराष्‍ट्र विधीमंडळाचा अवमान केला आहे. षंढ या शब्दावरून हक्क भंग आणू , असे त्‍यांनी म्‍हटले आहे. तर भाषा समजण्यासाठी तुम्हाला निवडून यावं लागेल, अशी खोचक टीका शिवसेना नेत्‍या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

मी व्यक्तीबद्दल नाही प्रवृत्ती बद्दल बोललो : संदीप देशपांडे

षंढ हा शब्द मी व्यक्तीबद्दल नाही प्रवृत्तीसाठी बोललो आहे. त्याबद्दल मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल मी तयार आहे, असे स्‍पष्‍ट करत संदीप देशपांडे यांनी पुन्‍हा एकदा हिंदी सक्‍तीच्‍या मुद्‍यावर राज्‍य सरकारवर टीका केली. मी कुठल्या ही कारवाईला सामोरे जाण्‍यास तयार आहे. माझा शब्द चुकला असेल; पण तुम्ही विचार करा. मी मराठी भाषेसाठी तुरूंगात जाईन. कोणताही कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे तर तिथे मराठी असायला पाहिजे. लोकलमध्ये तीन भाषेत सूचना लिहिलेली असते. विमानतळावरही तीन भाषेतच लिहिले जाते. महाराष्‍ट्र विधीमंडळातील कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजी भाषेत मजकूर लिहिला जाताे. आपली भाषा आपण जपली पाहीजे. बिहारचे लोक येऊन आपली भाषा जपणार आहेत का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT