

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत नुकतेंच दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज (दि.२०) पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील पुनर्मिलनाच्या शक्यतेवर भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले की, " सध्या मनसे आणि शिवसेना यांच्यात कोणतीही युती नाही, फक्त भावनिक चर्चा होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. आम्ही वर्षानुवर्षे एकत्र आहोत. आमचे नाते तुटलेले नाही. दोन्ही भाऊ युतीसंदर्भात निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले निर्णय आम्ही मान्य केला आहे: महाराष्ट्रासाठी मनसे आणि शिवसेना एकत्र यायचे असेल तर आम्ही ते करू."
महाराष्ट्राचे हितचिंतक असल्याचा दावा करणारे काही पक्ष आहेत, परंतु ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या अभिमानावर हल्ला करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना तोडली आणि अशा पक्षांशी आपले कोणतेही संबंध नसावेत, तरच आपण खरे महाराष्ट्रीय असू शकतो आणि ही परिस्थिती नाही तर महाराष्ट्रातील लोकांच्या भावना आहेत असे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, असा पुन्नरुच्चारही संजय राऊत यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही चुलत भावंडांमधील पुनर्मिलनाच्या शक्यतेचे स्वागत केले. तसेच राजकारणातील एक चांगले पाऊल म्हटले आहे.