Bombay High Court On Bail Application
मुंबई : 100 ग्रॅम मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या अरबाज असलम शेखचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. एनडीपीएस कायद्याच्या कलम 37 अंतर्गत असलेल्या कठोर अटींची अद्याप पूर्तता झालेली नाही. तसेच कथित गुन्ह्यात आरोपी निर्दोष असल्याचे मानण्यासारखे सबळ कारण नाहीत, असे निरीक्षण न्यायमूर्ती नीला गोखले यांनी नोंदवले आणि आरोपीला दिलासा नाकारला.
आरोपी अरबाज शेखविरोधात आझाद मैदान युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तो 3 नोव्हेंबर 2023 पासून तुरुंगात आहे. दोन वर्षांच्या दिर्घ तुरुंगवासाकडे लक्ष वेधत शेखने जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यापुढे सुनावणी झाली.
पोलिसांतर्फे सरकारी वकिल मेघा बाजोरिया यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. पोलिसांच्या तपास प्रक्रियेत झालेल्या विलंबाचा कोणताही प्रतिकूल मानता येणार नाही. आरोपी शेखकडून जप्त केलेला अंमली पदार्थ, रोख रक्कम तसेग पॅकिंगचे साहित्य याचा विचार करता अंमली पदार्थाच्या तस्करीचे कारस्थान उघड होते, असा युक्तीवाद ॲड. बाजोरिया यांनी केला.
2 नोव्हेंबर 2023 रोजी गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना जोगेश्वरीत शेख संशयास्पदरित्या आढळला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 100 ग्रॅम एमडी सापडले होते.
आरोपीने सुरुवातीला स्वतःची ओळख हार्दिक चंदुभाई सोलंकी अशी सांगितली होती. नंतर त्याचा खोटेपणा उघड झाला होता. याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले असता न्यायालयाने शेखला जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.