

मुंबई : हिवाळा सुरू झाला असतानाच मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेपार पोहोचला आहे. एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सोमवारी सरासरी 208 इतका एक्यूआय नोंदला गेला. 200 ते 250 दरम्यानचा एक्यूआय म्हणजे आरोग्यासाठी अतिशय घातक हवा असे आहे. पीएम 10 आणि पीएम 2.5 चे प्रमाणही वाढले असून अनुक्रमे 136 आणि 107 मायक्रो-ग्राम्स पर क्युबिक मीटर इतके होते.
मुंबईत सध्या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. बोरिवली (पूर्व) येथील एक्यूआय 200वर पोहोचला. कांदिवली (191) आणि मालाडमध्येही (189) प्रदूषणात वाढ दिसून आली. पूर्व उपनगरांत गोवंडी आणि दक्षिण मुंबईत कुलाबा (दोन्ही ठिकाणी 198) तसेच चकाला (191) भागातही प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. देवनार (198) तसेच गोवंडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात (200) वायू प्रदूषणाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. कुर्ला (198), भांडुप (188) आणि सिद्धार्थनगर, वरळी (187) भागालाही वायू प्रदूषणाने व्यापले आहे.
दुसरीकडे, मुंबईत तापमानात वाढ कायम आहे. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये सोमवारी रविवारच्या (किमान 22 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस) तापमानाची पुनरावृत्ती झाली. मंगळवारी (23/34 अंश सेल्सिअस) त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.
थंडीचे कमी अधिक प्रमाण तसेच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. श्वसनाचे आजार आणि हृदयाचे विकार असलेल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी व रात्री बाहेर जाणे टाळावे. प्रदूषित भागात जाताना एन 95 मास्कचा वापर करावा, उबदार कपडे घालावेत आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
कारवाईकडे लक्ष
मुंबईत दोनशेच्या पुढे एक्यूआय गेल्यास प्रदूषणकारी कारखान्यांना टाळे ठोकण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात दिला. प्रदूषण रोखण्यासाठी दिलेली आचारसंहिता न पाळल्यास सुरू असलेली सर्व बांधकामे थांबवण्याची धमकीही प्रशासनाने दिली. त्यानंतर तीनच दिवसांनी मुंबईचा एक्यूआय दोनशे पार गेला. आता महापालिका कारवाई करते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईत सर्वाधिक कारखाने गोरेगावमध्ये असून त्याखालोखाल अंधेरी आणि कुर्ल्याचा क्रम लागतो.