मुंबई : दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयए मार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. घटना घडून आज पाच वर्षे होत आली. अजून किती वर्षे या प्रकरणाचा तपास करणार आहात, असा सवाल न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजितसिंग भोसले यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. तुम्हाला फक्त ती आत्महत्या आहे की सदोष मनुष्यवध आहे हे शोधून काढायचे आहे अशी टिपणीही न्यायमूर्तींनी केली.
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी 14 मजल्याच्या इमारलीवरून पडून मृत्यू झाला. सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष तेव्हा काढला. मात्र, मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडले.दिशाचा मृत्यू हा अपघाती नव्हता, तसेच तिच्यावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाचे वडील सतिश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
या प्रकरणी पोलिसांनी अनेक वेळा याचिकाकर्ता आणि त्यांच्या पत्नीचे जबाब नोंदवले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कोणावरही संशय नाही. आता पाच वर्षांनंतर, वडील हा वाद उपस्थित करत आहेत,याकडे राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील ॲड.मानकुवर देशमुख यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मृत्यूची चौकशी अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगताच न्यायमूर्ती म्हणाले, आणखी किती वर्षे चौकशी करणार आहात?
सतीश सालियन यांच्या जबाबांच्या प्रती आणि कायद्यानुसार परवानगी असलेल्या इतर मूलभूत तपासाशी संबंधित कागदपत्रे का दिली जात नाहीत अशी विचारणाही न्यायालयाने केली व सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.