

पोलादपूर ः पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील माटवण बौद्धवाडी परिसरात बेकायदेशीररीत्या गुरे वाहून नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलादपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी तानाजी गणपत मोरे (वय 26, रा. सुतार आळी, बिरवाडी, ता. महाड), विशाल लक्ष्मण म्हस्के (वय 31, रा. माटवण, पोलादपूर), लहू महादेव वेनुपुरे (वय 26, रा. मुपो हिरडशी, ता. भोर, जि. पुणे) यांच्या ताब्यातील दोन पिकअप टेम्पो व एक स्विफ्ट कार या तीन वाहनांना पोलिसांनी जप्त केले.
या वाहनांत एकूण चार बैल आढळून आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एन. पी. कोंडाळकर करत आहेत. रायगड जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीर वाहूतक करणे, त्यांची कत्तल करणे आदी घटना मागील काही वर्षात घडल्या आहेत. यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.