मुंबई : 17 वर्षांपूर्वी लोकल ट्रेनच्या प्रवासात झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. मृत तरुण वैध प्रवासी नव्हता, असा निष्कर्ष काढत रेल्वे दावे न्यायाधिकरणाने नऊ वर्षांपूर्वी भरपाईचा दावा फेटाळला होता. त्याविरोधातील पालकांचे अपील उच्च न्यायालयाने मंजूर केले. भरपाईसाठी पालक आपल्या मुलाच्या मृत्यूचा फायदा उठवणार नाहीत, असे निरिक्षण न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नोंदवले.
जोगेश्वरी पूर्वेकडील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेल्या 17 वर्षांच्या तरुणाचा 5 सप्टेंबर 2008 रोजी रात्री अपघाती मृत्यू झाला. गणेशोत्सवादरम्यान तो मित्रांसोबत लालबाग येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जोगेश्वरी स्टेशनवरून लोअर परळ स्टेशनला लोकल ट्रेनने प्रवास करीत होता. एल्फिन्स्टन आणि लोअर परळ स्टेशनदरम्यान ट्रेनच्या गर्दीमुळे तो खाली पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र रेल्वे दावे न्यायाधिकरणाने तो वैध प्रवासी नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्याच आधारे 29 जानेवारी 2016 रोजी भरपाईचा दावा फेटाळला होता.
त्या निर्णयाविरोधात तरुणाच्या पालकांनी ॲड. दीपक आजगेकर यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर सुनावणी घेत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी मृत तरुणाच्या पालकांना दिलासा दिला. तरुणाच्या आई-वडिलांना आठ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मुलाच्या मृत्यूमुळे पालकांना होणारे नुकसान अकल्पनीय आहे. ते नुकसान पैशांनी भरून काढता येत नाही. सामान्यतः पालक अशा घटनेची संधी साधून रेल्वे कायदा, 1989 अंतर्गत भरपाईचा दावा दाखल करणार नाहीत. त्यामुळे दावा खरा आहे की नाही हे ठरवण्यासाठी हा घटक विचारात घेतला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.