नवी मुंबई : मुसळधार पावसाचा फटका मुंबई एपीएमसीत भाजीपाला बाजाराला बसला. आज बाजारात आवक घटली असून सरासरी लहान मोठी वाहने धरुन ३०० गाड्यांची आवक झालेली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तिसऱ्या दिवशीही ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे बाजारभाव ३५ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे २५ ते ३० टक्के भाजीपाला गाळ्यांमध्ये पडून असल्याची माहिती घाऊक व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भाजीपाला बाजारात पाणी साचले आहे. मात्र त्याची दखल एपीएमसी सचिव शरद जरे यांनी अद्यापही घेतली नाही. सचिवांनी भाजीपाला बाजाराची काय स्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मालाचे पावसामुळे काय नुकसान झाले, याची पाहणी देखील केली नाही. अत्यंत दयनीय अवस्थेत भाजीपाला बाजारात व्यापारी आपला व्यापार करतात, अशा संतापजनक प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या.
मुंबईतील किरकोळ ग्राहक माल खरेदी करण्यासाठी येतात, त्यांनी आज पाठ फिरवली. यामुळे मालाला उठाव नसल्याने ३० टक्के भाजीपाला शिल्लक राहिला. तो या मुसळधार पावसामुळे गुरुवारी फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. पाणी लागल्याने भाजीपाला सडतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
ग्राहकांनी फिरवली पाठ
एपीएमसी भाजीपाला बाजारात आज सरासरी ३०० गाड्यांची आवक आहे. मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली. किरकोळ खरेदीदार बाजारात फिरकले नाहीत. त्यामुळे मालाला उठाव नाही. उपनगरांमध्ये जागोजागी पाणी साचलेले आहे. त्यामुळे ग्राहक आज या ठिकाणी बाजारात पोहोचू शकला नाही. ग्राहक न आल्यामुळे ३० टक्के माल शिल्लक आहे. बाजारभाव ३० ते ४० टक्क्यानी उतरलेले आहेत.