

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून, रविवारी (दि. १४) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावात कांदापात तब्बल १३ हजार ६५९ रुपये प्रतिशेकडा दराने विकली गेली.
त्यामुळे भाजीपाल्याचे भाव सध्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. फळभाज्यांना प्रतिकिलो ६५ ते ७५ रुपयांहून अधिक दर मिळत आहेत. पालेभाज्यांमध्ये कांदापात, मेथी, कोथिंबीर आणि शेपू यांना उच्चांकी भाव मिळाले आहेत.
मेथीला ७हजार ४०० रुपये, तर कोथिंबिरीला ५ हजार रुपयांहून अधिक दर मिळाल्याची नोंद बाजार समितीत झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ६० ते ८० रुपये, तर मेथीची जुडी ६५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू झाला असला, तरी जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. विहिरी, शेततळी आणि अन्य जलस्रोतांतील पाणीपातळी घटल्यामुळे भाजीपाला पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. सध्या बाजारात केवळ ४० ते ४५ टक्केच आवक होत आहे.
दरम्यान, सुट्या आणि लग्नसराई हंगामामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र पुरवठा मर्यादित असल्यामुळे दरांमध्ये आणखी वाढ होत आहे. वाढलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील दीड महिन्यात भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.