मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 50 टक्के रुग्ण 40 वर्षाच्या आतील असल्याचे एका अमेरिकन संशोधन अहवालातून पुढे आले आहे. यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केवळ व्यायाम करणे पुरेसे नाही, तर तुम्हाला संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
धूम्रपान करणे आणि नियमित मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका खूप वाढतो. तज्ज्ञ यामुळे होणार्या नुकसानीबद्दल लोकांना नेहमीच चेतावणी देत आले आहेत आणि याचे सेवन न करण्याचा सल्लाही देतात.
लठ्ठपणाला अनेक आजारांचे मूळ मानले जाते. हृदयाच्या आरोग्यासाठी शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील जबाबदार असते. यामुळे उच्च रक्तदाब, उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तातील साखर यांसारखे आजार होऊ लागतात.
एका अमेरिकन संशोधनानुसार, 2015 मध्ये भारतात 6.3 कोटी लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते आणि त्यापैकी 2.3 कोटी लोकांचे वय 40 पेक्षा कमी होते. त्याचप्रमाणे, 2018 मध्ये आलेल्या लॅन्सेटच्या अभ्यासादरम्यान 1990 ते 2016 पर्यंतच्या हृदयरोगाच्या प्रकरणांचा डेटा गोळा करण्यात आला होता. त्यानुसार, 1990 मध्ये भारतातील एकूण मृत्यूंपैकी 15.2 टक्के मृत्यूंना हृदयाशी संबंधित आजार जबाबदार होते. तर 2016 मध्ये हा आकडा वाढून 28.1 टक्के झाला होता. यानुसार, 2016 मध्ये भारतात होणार्या प्रत्येक 100 मृत्यूंपैकी 28 मृत्यूंना हृदयाशी संबंधित आजार जबाबदार होते.
तणावाला हृदयाच्या समस्यांचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. तो केवळ आपल्या मनःस्थितीवरच परिणाम करत नाही, तर आपल्या शरीरासाठीही खूप हानिकारक असतो. रक्तवाहिन्यांवर दीर्घकाळ दबाव पडतो. संशोधकांच्या मते, दीर्घकाळच्या तणावामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका 60 टक्क्यांपर्यंत वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनासाठी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे सामान्य एरोबिक्स किंवा 75 मिनिटे वेगवान एरोबिक व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. तथापि, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना जास्त शारीरिक श्रमाचे व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अशा लोकांनीही निरोगी राहण्यासाठी नियमित चालणे, योग करणे आवश्यक आहे.