

गर्भावस्था हा नाजूक काळ असतो. त्यादरम्यान झोपणे, आहार, मनस्थिती चांगली असणे आवश्यक असते. तसेच व्यायाम करावा असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, गर्भधारणा आणि हृदयविकार यांविषयी फारसे बोलले जात नाही. गर्भारपणात शरीराच्या आतील रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे हृदयाचा वेगही वाढतो.
डॉ. प्राजक्ता पाटील
स्तविक भारतात जन्माला येणाऱ्या नवजात वा बालकांपैकी १२ लाख नवजात बालके जन्मतःच हृदयरोग घेऊन जन्माला येतात. गर्भारपणात हृदयाचे ठोके जास्त वेगाने पडतात. ते तसे पडायलाही हवेत. कारण हृदय जेव्हा चांगल्या प्रकारे काम करते, तेव्हाच गर्भाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त यांचा पुरवठा होतो. या प्रक्रियेत थोडी जरी गडबड झाली, तर आई आणि बाळ दोघांसाठीही ते धोकादायक असते.
गर्भारपणात शरीराच्या आतील रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे हृदयाचा वेगही वाढतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्याही आरोग्यावर होत आहे. ऑफिस आणि घर दोन्ही आघाड्यांवर कसरत करता करता शारीरिक आणि मानसिक दोन्हीमध्ये सामंजस्य राखणे अवघड होते. हे सामंजस्य राखता येत नाही म्हणूनच उच्च रक्तदाब आणि हृदयाशी निगडीत आजार वाढतात.
हायपर टेन्शन आणि उच्च रक्तदाब यांच्यामुळे हृदयाशी निगडीत आजारांचे धोके अधिक वाढतात. त्यामुळेच गर्भारपणी हृदयाचे आजार कमी करण्यासाठी उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शन या आजारांना दुर्लक्षून चालणार नाही. हृदयाशी निगडीत आजारात हृदयाचे ठोके वाढवणारे कोणतेही काम करणे टाळावे.
मात्र, गर्भारपणात हृदयाचे ठोके वाढतात. कारण गर्भाला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा होत असतो. त्यामुळे वाढत्या हृदयाच्या ठोक्यांकडे लक्ष द्यावे लागते. अनेकदा गर्भाला ऑक्सिजनची अधिक गरज भासल्यास तो पुरवठा करण्याचा दाब हृदयावर पडतो. हा दबाव हृदयासाठी अधिक धोकादायक असतो. या दरम्यान हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष देण्याची विशेष गरज असते.
गर्भधारणा होण्याआधीपासून हृदयाशी संबंधित काही आजार असल्यास गर्भधारणेचा विचार अत्यंत काळजीपूर्वक करा. गर्भारपणात वजन आणि हृदयाचे ठोके यांच्याबरोबरच लघवी आणि रक्त यांचीही तपासणी करावी.
तसेच गर्भाविषयी वेळोवेळी माहिती करून घ्यावी. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होत असतात आणि हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे गर्भधारणेच्या निर्णयात वयाचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे. धूम्रपान आणि मद्यपान करत नसाल, तर चांगलीच गोष्ट आहे. पण, या गोष्टी करत असाल, तर गर्भारपणाच्या काळात मात्र या गोष्टींपासून लांब राहावे, गर्भारपणात वजन वाढणे ही सामान्य बाब आहे.
पण, ते अति वाढत असल्यास नक्कीच चिंतेची बाब ठरते. म्हणूनच दर आठवड्याला वजन तपासत राहावे. तसेच गर्भारपणाच्या काळात मन अधिकाधिक प्रसन्न ठेवावे. या काळात आईने आरोग्याकडे केलेल्या प्रत्येक दुर्लक्षाचे परिणाम बाळावर होत असतात. त्यामुळे गर्भारपणात तब्येतीची काळजी अधिक घेणे आवश्यक असते.
जन्मजात हृदयविकार झाल्यास बाळाला आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे लक्षात घेता मेडिटेशन, हृदयाला पोषक ठरणारा आहार, नियमित प्राणायाम, योगसाधना, पूर्ण विश्रांती, चालण्याचा व्यायाम, अशी आनंददायी जीवनशैली अंगिकारावी.