कोपरखैरणे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बेकायदा फेरीवाल्यांना वेळीच आवर न घातल्याने आता त्यांची मजल सुरक्षारक्षक व अतिक्रमण पथकावर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. गुरुवारी अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांनी सुरक्षारक्षक तसेच अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्या फेरीवाल्यांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसीतील भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला बाजारांच्या प्रवेशद्वारांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. तात्पुरती कारवाई होते. मात्र पुन्हा ते तेथेच आपले बस्तान मांडतात.
गुरुवारी अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असताना काही फेरीवाल्यांनी अचानक सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, फेरीवाल्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पदपथ व रस्त्यांवर अनधिकृतरीत्या बसलेल्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे फेरीवाले आणि प्रशासन यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला असून कारवाई पथकाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आश्रयामुळे मुजोरपणा
या फेरीवाल्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. काही व्यापाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे फेरीवाले जागा सोडण्यास टाळाटाळ करतात आणि कारवाई दरम्यान रस्त्यावरून माल उचलून बाजारात आश्रय घेतात. कारवाई पथकांची पाठ फिरली की पुन्हा येऊन त्याच ठिकाणी पुन्हा विक्री सुरू करतात. याला एपीएमसी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि फेरीवाले व अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबतचे संगनमत जबाबदार असल्याची चर्चा बाजारात आहे.
समस्या काय ?
एपीएमसीतील पाचही बाजारांच्या प्रवेशद्वारांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत असते. पदपथांवरही फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. माल विकून हे फेरीवाले कचरा तेथेच फेकून देतात. तो नाल्यांमध्ये पडून राहतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचीही समस्या गंभीर झाली आहे.