

पनवेल : नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) व्यापक पुनर्गठन आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पनवेल महापालिकेला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे. यामुळे 14 प्रभागांत फेरबदल होणार आहेत.
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत पार पडली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 13, 14, 16, 19 आणि 20. या 14 प्रभागांमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) श्रेणीसाठी एकूण 6 जागांची सोडत नव्याने काढण्यात येणार आहेत. तसेच, या बदलामुळे उर्वरित संरचनेनुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गातील जागादेखील नियमानुसार नव्याने आरक्षित करण्यात येणार आहेत.
17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
25 नोव्हेंबरपर्यंत हरकती
सुधारित प्रारूप आरक्षणावर 19 नोव्हेंबरपासून नवीन सोडतीनंतर जाहीर होणाऱ्या सुधारित प्रारूप आरक्षणाबाबत नागरिकांकडून 25 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. मुख्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात लेखी अर्ज दाखल करून हरकती नोंदवू शकतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.