हरिहरेश्वर येथे आजपासून खगोल दर्शन महोत्सव pudhari photo
मुंबई

Harihareshwar astronomy festival : हरिहरेश्वर येथे आजपासून खगोल दर्शन महोत्सव

एमटीडीसीकडून आयोजन : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय ‌‘डार्क स्काय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे 24, 25 व 26 एप्रिल रोजी खगोल दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या महोत्सवात ॲस्ट्रॉनइराच्या संस्थापिका व संचालिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टार गेझिंग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. खगोल अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटनप्रेमींसाठी हा एक अनोखा, ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध उपक्रम ठरणार आहे.

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी या ठिकाणाला अधिक पसंती द्यावी या उद्देशाने हरिहरेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम विशेषरित्या आयोजित करण्यात येत असून पर्यावरणपूरक व अनुभवाधारित पर्यटनाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात स्टार गेझिंग (आकाश निरीक्षण) सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खगोलविषयक संवादात्मक प्रदर्शने, प्रकाश प्रदूषण व ‌‘डार्क स्काय‌’ संवर्धनावरील माहितीपर उपक्रम तसेच पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, नैसर्गिक अंधाराचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन पर्यटन मंत्री देसाई व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT