मुंबई ः सर्वेक्षणात आढळलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचा नमुना. यामध्ये छायाचित्रेही आढळली आहेत. pudhari photo
मुंबई

Gyan Bharatam project : हस्तलिखितांच्या जतनासाठी केंद्राचा ज्ञान भारतम्‌‍ प्रकल्प

महाराष्ट्रात सर्वेक्षण मोहिमेत 20 दिवसांत आढळली 2 लाख 18 हजार दुर्मीळ हस्तलिखिते

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः प्राचीन परंपरेतील विविध विद्याशाखांच्या ज्ञानाचा खजिना हस्तलिखितांच्या रूपात अजूनही देशभरातील विविध संस्था, देवस्थाने, मठ, संग्रहालये आणि वैयक्तीकरित्या शाबूत आहे. या हस्तलिखितांच्या दुर्मीळ खजिन्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी केंद्र शासनाने ज्ञान भारतम्‌‍ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात 16 मार्चपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणात सुमारे 2 लाख 18 हजार दुर्मीळ हस्तलिखित आढळून आली आहेत. या हस्तलिखितांचे सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत पुरभिलेख संचालनालयाच्या वतीने डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

पारंपरिक ज्ञान हस्तलिखितद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतु ही सर्व हस्तलिखिते विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे.

2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ (नागपूर) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे) या दोन संस्था समूह केंद्र तर पुण्याचा आनंद आश्रम आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्था स्वतंत्र केंद्र म्हणून काम पाहणार आहेत.

राज्य शासनाच्या वतीने पुराभिलेख संचालनालयाची समन्वयक संस्था म्हणून काम करणार आहे. समन्वयक अधिकारी म्हणून पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले व मराठी भाषा विकास संस्थेच्या उप संचालक अंजली ढमाळ यांची उप समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. संबंधित संस्था व खासगी संग्राहकांनी आपल्याकडील हस्तलिखिते ज्ञानभारतम्‌‍ ॲपवर अपलोड करावी
डॉ. किरण कुलकर्णी, सचिव - मराठी भाषा विभाग
या प्रकल्पामुळे विविध संस्था व संग्रहाकडे असलेल्या ज्ञानावर प्रकाश पडणार आहे. अनेक दुर्मीळातील दुर्मीळ हस्तलिखिते आता सर्वेक्षण मोहीमेत निदर्शनास आली आहेत.
सुजीतकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT