Gutkha ban Maharashtra pudhari photo
मुंबई

Gutkha ban Maharashtra: मुंबईच्या कचर्‍यात खाऊन टाकलेल्या गुटख्याच्या पुड्या येतात कशा?

मुंबई-नवी मुंबईतील सर्वेक्षणातून गंभीर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा, तंबाखूयुक्त पान मसाला आणि संबंधित उत्पादनांवर दीर्घकाळापासून बंदी असूनही, मुंबई आणि नवी मुंबईत रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यात गुटखाबाज मंडळींनी खाऊन टाकलेल्या गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आढळतात कशा, असा प्रश्न एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे.

मुंबईचा कचऱ्याचा नकाशा गुटख्याच्या रिकाम्या पुड्यांनी व्‍यापला असून, सध्या खाद्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी राज्यव्‍यापी मोहीम हाती घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासनासमोर हे नवेच काम वाढवून ठेवले गेले आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, २०११ नुसार अन्नपदार्थांमध्ये, पान मसाल्यासह, तंबाखू आणि निकोटीन घटक वापरण्यास मनाई आहे. एप्रिल २०१२ पासून महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाल्यावर बंदी घालण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या वर्षांत आणखी नियम आले आणि पान मसाल्यातील मॅग्नेशियम कार्बोनेटवरील निर्बंध कडक झाले.

पण नियम पाळतील तर ते व्‍यसनी कसले?

हीलिस सेखसारिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ या नवी मुंबईस्थित संस्थेच्या असोसिएट सेसिली रे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार मुंबई आणि नवी मुंबईत निवडक ठिकाणी गुटख्याचे सेवन किती होते याचा अंदाज घेण्यासाठी कचऱ्यात सापडणाऱ्या गुटख्याच्या रिकाम्या पुड्यांचा अंदाज एका सर्वेक्षणात घेतला गेला.

डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील पदव्युत्तर विद्यार्थिनी खुशी ओझा यांनी, मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागात राहणाऱ्या पंधरा स्वयंसेवकांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. यात सहभागी झालेल्या सोळा जणांनी त्यांच्या निवासस्थानाजवळच रस्त्याच्या कडेला, रेल्वे स्थानक परिसरात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाकून दिलेले गुटख्याच्या पुड्यांचे रॅपर्स गोळा केले.

वडाळा, लालबाग, चुनाभट्टी, कुर्ला, शीण-धारावी, गुरु तेग बहादूर नगर, वांद्रे, देवनार पूर्व, गोरेगाव, कांदिवली, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, वाशी आणि पनवेल आदी ठिकाणी हे गुटख्याच्या कचऱ्याचे नमुने गोळा करण्यात आले.

दोन ब्रँडचा कचरा अधिक

या कचऱ्याच्या विश्लेषणात तंबाखूजन्य उत्पादनांच्या अनेक प्रकारांचे रॅपर्स आढळले. पान मसाल्याचे सात ब्रँड, गुटख्याचे दोन ब्रँड आणि चघळण्याच्या तंबाखूचे दोन ब्रँड या कचऱ्यात सतत आणि सर्वत्र आढळले.

विविध ठिकाणी या टाकून दिलेले गुटख्यांचे आणि तंबाखूजन्य उत्पादनांचे मुंबईभर सापडणारे रॅपर्स किंवा रिकाम्या पुड्या काय सांगतात? मुंबईसह राज्यभर बंदी असूनही गुटख्याचे एक ना अनेक बॅन्डस बाजारात सर्रास उपलब्ध आहेत आणि त्यांचे प्रचंड प्रमाणात सेवनही सुरू आहे.

हे सर्वेक्षण मर्यादित प्रमाणात करण्यात आले. या सर्वेक्षणाची रचना व्यापक नव्हती, तरीही हाती आलेल्या नमुन्यांनुसार तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर शहरी सार्वजनिक ठिकाणी प्रचंड प्रमाणात असल्याचे हे सर्वेक्षण दाखवून देते.

  • सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतात तोंडाच्या कर्करोग आणि इतर प्रतिकूल आरोग्य परिणामांसाठी धूम्ररहित तंबाखू उत्पादने हा एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे.

  • समाजाला पोखरणारा कर्करोग ज्यामुळे होतो ते तंबाखूजन्य पदार्थ बंदी असूनही मुंबईत सर्रास मिळतात आणि हे पदार्थ खाणारे रिकाम्या पुड्या सर्रास रस्त्यांवर फेकतात. यातून बंदीचे नियम एक तर अपयशी ठरले असावेत किंवा या नियमांमध्ये पळवाटा असाव्‍यात किंवा आतापर्यंत नियम लागू करणाऱ्या यंत्रणांनी त्याकडे डोळेझाक केली असावी इतकेच म्हणता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT