नवी मुंबई: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये आयोजित गुरुपूजन सोहळ्यांमुळे नवी मुंबईतील बाजारात गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे वाशी, नेरुळ, सीबीडी बेलापूर, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, परिसरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये गुलाबाच्या फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
सामान्य दर्जाच्या एका गुलाबाच्या फुलाचा दर २० ते ३० रुपये, तर मोठ्या आकाराच्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या गुलाबासाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी आकर्षक पॅकिंग केलेले किंवा लांब देठाचे प्रीमियम गुलाब ५० रुपयांपर्यंत विकले जात आहेत.
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येपासून फुलांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. अनेकांनी गुरुजनांच्या सत्कारासाठी एकेरी गुलाब, तर काहींनी पुष्पगुच्छ आणि हारांची खरेदी करत आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सामाजिक संस्था आणि विविध धार्मिक ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी कायम आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा मागणी चांगली असल्याने फुलव्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाळी हंगामात फुलांची आवक काही प्रमाणात कमी असतानाही गुरुपौर्णिमा उत्सवासाठी वाढलेल्या मागणीमुळे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून गुलाबासह झेंडू, शेवंती, ऑर्किड आणि जरबेरा या फुलांच्याही विक्रीत वाढ झाली आहे. फुलविक्रेत्यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेनिमित्त ग्राहकांची वर्दळ कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे फुल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे.