Gulf Stranded Passengers Pudhari
मुंबई

Gulf Stranded Passengers: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर ४०५ प्रवासी मुंबईत सुखरूप; विशेष विमानांतून मराठीजनांची सुटका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजनांकडे समन्वय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन विशेष विमानांची व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/ ठाणे : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ल्यांनंतर आखाती देशांत युद्धाचा भडका उडाला आहे. लढाईला अचानक तोंड फुटल्याने विविध आखाती देशांत महाराष्ट्रातील किमान 900 पर्यटक अडकले आहेत. या मराठीजनांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या दोन विमानांतून 164 प्रवासी मुंबई विमानतळावर मंगळवारी रात्री उतरले. तत्पूर्वी सोमवारी मध्यरात्री दुबईतून 41 प्रवासी घेऊन पहिले विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. लंडनवरून 200 प्रवाशांना घेऊ न मंगळवारी सकाळी ब्रिटीश एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे परदेशातून भारतात परतल्यांची संख्या 405 झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारसह विविध यंत्रणांच्या संपर्कात असून, मंत्री गिरीश महाजन यांना समन्वय कार्यात लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मदतीचा हात पुढे करत दोन विशेष विमानांची व्यवस्था केली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही विमाने मुंबईत उतरली. पुणे, ठाणे, मुरबाड, शहापूर, अहिल्यानगर, मुंबई आदी ठिकाणांतील सुमारे 164 पर्यटक आणि नागरिक या विमानात होतेे.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत कोकणातून दुबई आणि कुवैत येथे गेलेले जवळपास 200 पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ठाण्यातील 53 लोक, सिंधुदुर्गचे 102, रायगड, रत्नागिरीचे 64, कोल्हापूर भागातील 150 लोकांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री दुबईतून 41 प्रवासी घेऊन पहिले विमान मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. एअर इंडियाने पर्यटकांच्या परतीसाठी 10 विमाने /...2युद्धाच्या आखातात अडकलेले

405 प्रवासी मुंबईमध्ये उतरले !

तैनात केल्याची माहिती आहे.

दुबईत अडकलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक 30 प्रवासी हे ठाणे शहरातील आहेत. यामध्ये ठाणे शहर : 30, शहापूर : 13, वासिंद : 1, भिवंडी : 9 अशा प्रवाशांची संख्या आहे. दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांची व्यवस्था दुबई सरकारने केली आहे. अरब कंट्रीमधील अन्य देशातील अडकलेल्या भारतीय नागरिकांची व्यवस्था तेथील सरकारने केली आहे. अमेरिका + इस्रायल - ईराणमधील युद्धामुळे दुबईत अडकून पडलेले कल्याण पश्चिमेतील 6 पर्यटक सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप मायदेशी आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

शिंदे थेट संपर्कात

दुबईमध्ये अडकलेल्या मराठीजनांशी दूरध्वनीवर संवाद साधून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना धीर दिला. दुबईतील डॉक्टर संजीव पैठणकर, महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, तसेच युवासेनेचे राहुल कनाल हे तेथील पर्यटक व विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात होते. शिवसेनेच्या वतीने दोन विशेष विमाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आणि संबंधित प्रवासी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सोमवारी रात्री उशिरा यूएईमधून 4 विमाने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळूरला पोहोचली. दुबई आणि अबुधाबीहून दोन हजारांहून अधिक भारतीय परतले.

उड्डाणे वाढली

इंडिगो एअरलाईन सौदी अरेबियातील जेद्दा येथून हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादसाठी 10 विशेष विमाने उडवणार आहे. त्याचबरोबर, एअर इंडिया एक्स्प्रेस मस्कतसाठी उड्डाणे सुरू करत आहे. यादरम्यान, अबुधाबीची एतिहाद, दुबईची एमिरेटस्‌‍ आणि फ्लायदुबईने निवडक उड्डाणे सुरू केली आहेत. अबुधाबी विमानतळावरून एतिहादची 15 विमाने इस्लामाबाद, पॅरिस, ॲमस्टरडॅम, मुंबई, कैरो, लंडनसाठी रवाना झाली.

विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप आणण्याचे आश्वासन

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांच्या मुलाला सुखरूपपणे मुंबईत परत आणण्याबाबत आश्वस्त केले. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा लंडनला जायला निघाला असता युद्धामुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला. व्हिडीओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती.त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाने अभिनयशी संपर्क साधला.

आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून, तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली आहे. तसेच, महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी

संपर्कात राहण्यास सांगितले आहे. जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

कल्याणचे जाधव कुटुंब परतले

कल्याण पश्चिमेतील ज्येष्ठ व्यावसायिक डी. बी.जाधव यांच्या कुटुंबातील 6 सदस्य 24 फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. मात्र अमेरिका + इस्रायल ईराण यांच्यातील युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इतर देश आणि दुबईपर्यंत पोहोचल्याने तेथेही हल्ले होत आहेत. अनेक भारतीय पर्यटकांप्रमाणेच जाधव कुटुंबातील 6 जणही अबुधाबीमध्ये अडकून पडल्याने इकडे कल्याणात त्यांच्या कुटुंबीयांचा अक्षरशः जीव टांगणीला लागला होता. या परिस्थितीमुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अबूधाबी येथून सोडण्यात आलेल्या विशेष विमानाने या सहा जणांसह अडकलेले इतर पर्यटकही सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत. याच दरम्यान अबुधाबी येथून सुखरूप घरी परतलेल्या कल्याणातील सहा पर्यटकांचे कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आले. फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्या काढून स्वागत करत पर्यटकांसह कुटुंबीयांनी भारत सरकारचे आभार मानले.

आखाती देशांत 97 लाख भारतीय कामाच्या निमित्ताने स्थायिक आहेत. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याने विविध आखाती देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 48 तासांत संवाद साधला. त्यात यूएई, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या प्रमुखांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील 24 पर्यटक दुबईत अडकले असून सर्वजण सुरक्षित आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाचगणीतील काही पर्यटकही दुबईत अडकून पडले असून त्यांच्याही परतीचा मुहूर्त नक्की नाही.

नाशिक ः परिस्थिती शांत झाल्यानंतर, पुढील दोन-तीन दिवसांत विशेष विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. आखाती देशांत अडकलेल्या पर्यटकांच्या जत्थ्याशी ग्रुप कॉल करून आम्ही 300 ते 400 जणांशी संवाद साधला. मी स्वतः पंधरा-वीस गटांशी बोललो. ते सर्वजण सुरक्षित असून सध्या हॉटेलमध्ये असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

सिंधुदुर्गचे 102 अडकले

आखाती देशांमध्ये अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण 102 नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी 11 नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून त्यांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात ओली आहे. त्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (02362) 228847 / 1077 तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (02362) 228614 या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT