मुंबई : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये करण्यात आलेले बदल येत्या 22 सप्टेंबरपासून अंमलात येत आहेत. त्याचा परिणाम आगामी सणासुदीच्या हंगामावर जाणवणार आहे. दसर्यापासून सुरू होणारा हा हंगाम वर्षअखेरपर्यंत चालेल. या काळात ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आपले नियोजन केले आहे. त्यामुळे या वस्तू ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी निघालेली वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरलेली दिसतील.
वाहन कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करणारे उद्योग, किरकोळ वस्तूंची बाजारपेठ आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणारी खरेदी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे बुकिंग करण्यात कंपन्या व्यग्र आहेत. जीएसटीची पुनर्रचना होईपर्यंत बहुतांश कंपन्यांनी उत्पादनाच्या बाबतीत आस्ते कदमचे धोरण स्वीकारले होते. ही पुनर्रचना झाल्यानंतर या कंपन्यांना अंदाज आला. ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर घटवण्यात आल्यानंतर त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच, कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे.
सर्वाधिक मागणी असलेल्या वाहन उद्योगालाच आपली उत्पादने देशात ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी जवळपास 60 हजार ट्रक किमान तीन महिन्यांसाठी लागणार आहेत. याआधी संपूर्ण सणासुदीच्या काळात हाच आकडा 40 हजारांच्या आसपास होता, अशी माहिती एका अग्रगण्य उद्योगाच्या सूत्रांनी दिली. कंपन्यांना आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती अनेक उद्योगांच्या सूत्रांनी दिली.
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवर उतारा म्हणून या वाढलेल्या मागणीचा उपयोग होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. निर्यात थांबल्यानंतर होणार्या नुकसानीचा काही भाग देशांतर्गत बाजारपेठेच्या माध्यमातून भरून निघेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मारुती सुझुकीपासून ह्युंदाईपर्यंच्या उद्योगांनी आपल्या उत्पादनांमध्ये नेहमीपेक्षा अधिक वाढ अपेक्षित धरली आहे. कारण, वाहनांवरील जीएसटी घटवल्यानंतर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू केली आहे.
60,000 ट्रकची तीन आठवड्यांत वाहतुकीसाठी आवश्यकता. (गतवर्षी 40 हजार ट्रक धावले होते.)
फ्लिपकार्ट दीडपट अधिक वाहने उतरवणार
3.54 दशलक्ष टी.व्ही. सेटस्ची विक्री महिनाभरात अपेक्षित. नेहमीपेक्षा दुप्पट मागणी
4.5 ते 4.75 लाख कार्सची विक्री 22 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता. (गेल्यावर्षी 4 लाख कार्सची विक्री.)
अॅमेझॉन45 नवी वितरण केंद्रे उभारणार
वाहतूक भाडे महागणार; ट्रकची मागणी प्रचंड वाढली