मुंबई: गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयालगत सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारातून बोअरवेलची पाइपलाइन टाकून टँकरद्वारे पाण्याची अवैध तस्करी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पावसाला विलंब झाल्याने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना काही ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेत पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गोवंडीच्या कै. वामन तुकाराम पाटील मार्गावरील शताब्दी रुग्णालयाच्या लगत संबंधित बोअरवेलची पाइपलाइन थेट सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारातून रस्त्यावर आणण्यात आली आहे. या पाइपलाइनद्वारे पाण्याचा उपसा करून ते टँकरमध्ये भरून विविध भागात पुरवठा केला जात आहे.
गटारातून नेण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून हे पाणी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य किंवा इतर गंभीर आजारांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याशिवाय, संबंधित बोअरवेलमधून पाणी खेचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाचा इलेक्ट्रिक मीटर आणि वीज जोडणी उघड्यावर ठेवण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या विद्युत यंत्रणेमुळे शॉक लागून एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० ते १२ अवैध बोअरवेल
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिसरात १० ते १२ अवैध बोअरवेल विविध प्रकारे कार्यरत आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर माफियांकडून पाण्याची विक्री करून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे.
याप्रकरणी ट्विटर तसेच लेखी तक्रारींद्वारे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला . मात्र, राजकीय दबाव आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित सहभागामुळे कारवाई होत नाही. तसेच संबंधित विभागांकडून उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण इतर विभागांकडे वर्ग केले जात आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून गटारातून नेण्यात आलेली पाइपलाइन हटवावी, अवैध बोअरवेल व पाणी तस्करीवर कठोर कारवाई करावी तसेच उघड्यावर असलेली वीज यंत्रणा सुरक्षित करून संभाव्य दुर्घटना टाळावी-प्रवीण जाधव, स्थानिक नागरिक