मुंबई : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थिनींना बुरखा-नकाब घालून महाविद्यालयात येण्यास बंदी घातल्याने वाद उफाळला आहे. या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थिनींनी आंदोलन करत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे असलेल्या विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू केली. यात महाविद्यालयात येण्याच्या वेळा, प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळा यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी कोणते पोशाख घालणे टाळावे, हेदेखील नमूद केले. या पत्रकात जो पोशाख परिधान केल्याने धर्म समजू शकतो, असा पोशाख घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या अंतर्गत मुलींचा बुरखा आणि नकाब त्यांनी प्रवेशद्वारावर उतरवून फक्त हिजाब घालून महाविद्यालयाच्या आवारात यावे, असे म्हटले आहे.
या नियमाविरोधात काही मुलींनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना महाविद्यालयातून प्रवेश काढून घ्या, असे उत्तरही मिळाल्याचे काही मुलींनी सांगितले. त्यानंतर महाविद्यालय व व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी आंदोलन केले. दरम्यान, एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
आम्ही नकाब किंवा बुरख्यात जास्त सहजपणे वावरू शकतो. आमचा पोशाख आमच्या शिक्षणाच्या आड कसा येऊ शकतो, असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला. तर महाविद्यालयाकडून आम्ही कायदेशीर सूचना केल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिक माहिती देण्यास टाळण्यात आले.