Construction Pudhari
मुंबई

Goregaon Mulund Link Road: गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग बाधितांना लवकरच घरे; कांजूरमार्ग पुनर्वसन प्रकल्पातील 252 सदनिका तयार

मार्चअखेर घरांच्या चाव्या; उर्वरित इमारतींचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे बाधितांसाठी कांजूरमार्ग (पश्चिम) येथे पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. सातपैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत कामे सुरू आहेत. या इमारतींत 252 प्रकल्प बाधितांना मार्च अखेरपर्यंत 300 चौरस फुटांच्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत.

उर्वरित पाच इमारतींचे बांधकाम व त्यातील सदनिकांचे अंतर्गत काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

बांगर यांनी शुक्रवारी या बांधकाम प्रकल्पाला भेट देत सदनिकांची पाहणी केली. नगर अभियंता रामचंद्र कदम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदनिकांच्या अंतर्गत संरचना, पाणी, स्वच्छतागृह, वीज, उद्वाहन (लिफ्ट), पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

सदनिकांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. तथापि, याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांसाठी अन्य आवश्यक सोयीसुविधांचीही विहित वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करून या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.

असा आहे प्रकल्प

कांजूर (पश्चिम) येथे सुमारे 10,050 चौरस मीटर क्षेत्रफळावर 7 इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + 23 मजल्यांच्या इमारतींचा समावेश आहे. या 7 इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांसाठी एकूण 906 सदनिका बांधण्यात येत असून प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ 300 चौरस फूट आहे व त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित स्वच्छतागृह), स्वयंपाकघर यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात बाजार, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा 3 अंतर्गत जून 2026 पासून बोगदा खनन संयंत्राद्वारे भूमिगत बोगद्यांच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, अमर नगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT