मुंबई : पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या 'तुळशी' यंत्राने २७० मी. पेक्षा अधिक अंतर पार केले आहे. 
मुंबई

Goregaon Mulund Link Road deadline|गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला फेब्रुवारी २०२९ चा मुहूर्त

उपनगरांमधील कोंडी कमी होणार, 'विहार'चे खोदकाम सुरू; 'तुळशी'ने गाठला २७० मीटरचा टप्पा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूककोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचविणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्यांपैकी दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम ७ नोव्हेंबरपासून 'विहार' या अत्याधुनिक बोगदा खनन यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. तर पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या 'तुळशी' यंत्राने आतापर्यंत २७० मीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प असून, तो चार टप्प्यांत राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेतील अमर नगरदरम्यान ५.३४ किलोमीटर लांबीचे दुहेरी भूमिगत बोगदे उभारण्यात येत आहेत.

प्रत्येक बोगद्यात तीन मार्गिका असणार आहेत.दोन्ही बोगद्यांचा अंतर्गत व्यास १३ मीटर असून, त्यातून एकूण सहा मार्गिकांद्वारे वाहतूक होणार आहे. पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणारे 'तुळशी' हे यंत्र १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित झाले. सध्या त्याद्वारे दररोज सरासरी सहा मीटर खोदकाम केले जात असून, हा वेग टप्प्याटप्प्याने दहा मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. दरम्यान, मुलुंड येथील बोगद्याच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी आवश्यक रिट्रिव्हल शाफ्ट आणि रॅम्पच्या बांधकामात ७४३ बांधकामे बाधित होत आहेत. त्यापैकी ६१२ बांधकामे हटविण्यात आली असून, उर्वरित १३१ बांधकामे जानेवारी २०२७ च्या सुरुवातीला हटविण्याचे नियोजन आहे. बाधित कुटुंबांचे कांजूरमार्ग येथील पुनर्वसन इमारर्तीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.

असा आहे 'विहार' यंत्राचा व्याप

'विहार' यंत्राचा कटर हेड १४.४९ मीटर व्यासाचा असून, संपूर्ण यंत्राची लांबी ८३ मीटर आहे. प्रत्येक बोगद्याची एकूण लांबी ६,६७५ मीटर असून, त्यापैकी ५,३४० मीटर खोदकाम टीबीएमद्वारे होणार आहे. उर्वरित भागात बॉक्स बोगदा, प्रवेश-निर्गमन मार्गिका आणि शाफ्ट उभारण्यात येणार आहेत. दोन्ही बोगद्यांचा अंतर्गत व्यास १३ मीटर असून, त्यातून एकूण सहा मार्गिकांद्वारे वाहतूक होणार आहे.

दोन्ही बोगद्यांचे खोदकाम समांतर सुरू झाल्याने प्रकल्पाला गती मिळेल. कामात विलंब होऊ नये यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कामगार व अभियंत्यांच्या सुरक्षिततेसह खोदकामातून निर्माण होणाऱ्या मलब्याची योग्य विल्हेवाट लावण्यावरही भर देण्यात आला आहे.

- अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT