मुंबई : राज्यात एकीकडे बिबट्यांची दहशत निर्माण झालेली असताना, मुंबई उपनगरांतील गोरेगावात मात्र पिसाळलेल्या एका कुत्र्याने सुमारे 20 ते 25 नागरिकांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याने ये-जा करणारा नागरिक दिसल्यास त्यांच्या अंगावर झेप घेऊन चावा घेत आहे. यामुळे गोरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली असून सदर कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर, सिध्दार्थ नगर, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा भवनसह इतर ठिकाणी मोकाट कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. खुलेआमपणे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पालिकेकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो ठिकाण बदलत असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना त्याला जाळ्यात अडकवण्यास अडचणी येत आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याने लंकेश्वर मिश्रा(36), सुप्रिया शर्मा (19), किरण कुशलकर(26), शोभा कुशलकर (54), धनराज पाटील (45), महेश यादव(33) आणि रामसिंग भोई (50) यांच्यासह सुमारे 15 लोकांना शरीराच्या हात, पाय, गळा, डोळा आणि पाठ अशा विविध ठिकाणी चावा घेतला आहे.
नागपूर: राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी 2024 मध्ये मुंबईत 1 लाख 28 हजार 252 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. तसेच, राज्यात 40 लाख भटकी कुत्री असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हीच माहिती त्यांनी मंगळवारी विधानसभेतही दिली होती. कुत्र्यांबद्दलच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून, स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 7564976649 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.