

पोलादपूर : समीर बुटाला
रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये मागील काही महिन्यांपासून श्वानांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. पोलादपूर शहरामध्ये देखील भटक्या श्वानांनी हौदोस घातलेला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी एका महिलेला कुत्र्याने चावा देखील घेतल्याची घटना घडलेली आहे.
माणगांव-पुणे मार्गावर कुत्रा आडवा आल्याने एका चारचाकी कारच्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर काही ठिकाणी कुत्री वाहनांच्या मागे धावत येत असल्याने अपघाताची शक्यता वाडीस लागली आहे. श्वानांची वाढती संख्या व त्याच्या ओरडण्याचा होणार रात्रीच्या वेळेस त्रास या सर्व प्रकारामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पोलादपूर शहराची ओळख असून ग्रामीण भागातील नागरिकांचे पोलादपूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण मानले जाते त्यामुळे शहरामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची व शहरातील नागरिकांची वर्दळ नेहमीच असते. मात्र मागील काही वर्षांपासून भटक्या श्वानांची नसबंदी होत नसल्याने श्वानांचे प्रमाणात वाढलेले आहे.
तसेच पोलादपूर शहरांमध्ये अनेक ठिकाणी जखमी झालेले श्वान फिरत आहेत. त्यामुळे त्या श्वानांपासून वयोवृद्ध, स्थानिक नागरिक त्याचबरोबर शाळकरी मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच मागील दोनच दिवसापूर्वी पोलादपूर शहरातील स्थानिक नागरिक श्वेता महाडिक यांना एका श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलादपूर शहरात भीतीच्या वातावरण निर्माण झाले आहे.
या आधी देखील अशा घटना शहरांमध्ये घडल्या होत्या मात्र नगरपंचायतीकडून उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळेस शहरांमध्ये श्वान टोळीने फिरत असून मोटरसायकल स्वार त्याचबरोबर चालत जाणाऱ्या नागरिकांचा अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे श्वानांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून प्रशासन मूग गिळून आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर कुत्र्यांची उपययोजना करावे. तसेच जखमी असलेले कुत्रे यांचा देखील बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
पोलादपूर शहरांमध्ये श्वानांचा धुमाकूळ वाढला असून नागरिक, लहान मुले हे सुरक्षित नाहीत, त्यामुळे पोलादपूर नगरपंचायतने वेळेत दखल योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल.
संतोष चिकणे, स्थानिक नागरिक
पोलादपूर शहरामध्ये भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात वाढले असून वयोवृद्ध, शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे तर काही कुत्रे ही रात्रीच्या वेळी धावून अंगावर येत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे, त्यामुळे यावर उपाययोजना करावी.
राकेश सकपाळ, स्थानिक नागरिक