कांदिवली : गोराई येथे मुख्य मार्गाला जोडणारा संत निरंकारी मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. 30 फूट रुंदीच्या मार्गावर एका बाजूने खोदकाम केल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. इतरत्र ठेवलेले पाईप, साहित्य व जेसीबी, डंपर यांचा वावर यामुळे चालणेही जिकरीचे झाले असून गेल्या तीन महिन्यांपासून धीम्या गतीने काम सुरू असल्याने धुळीचा, अडचणींचा आणि वाहतूक कोंडीचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवासी आणि वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
गोराई ते न्यू लिंक रोडला जोडणारा संत निरंकारी मुख्य मार्ग आहे. या मार्गाच्या आजूबाजूस हॉस्पिटल्स, शाळा व सभागृह आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. संत निरंकारी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. एक बाजू खोदून भूमिगत पाईप, जलवाहिन्या केबल्स टाकण्याची कामे सुरू आहेत.अर्ध्या भागातील मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.उरलेल्या मार्गावर वाहने ये -जा कर असतात.
खोदकामात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी धूळ, ठेवलेले साहित्य, नाके व कोपऱ्यांवर टाकलेल्या मोठ्या पाईप, दगड,मातीचे ढिगारे यामुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ठेकेदारावर महापालिका अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने कामे धिम्या गतीने सुरू आहेत.