मुंबईतील पहिले कांदळवन उद्यान बोरिवली येथील गोराई जेट्टीजवळ साकारण्यात आले आहे. हे उद्यान महाराष्ट्र सरकारचा एक पथदर्शी उपक्रम असलेले बहुप्रतिक्षित होते. ते आता पूर्णत्वाच्या जवळ आले असून लवकरच ते जनतेसाठी खुले होणार आहे.
हे भारतातील पहिले समर्पित खारफुटी उद्यान ठरले आहे, अशी माहिती वन विभाग प्रशासनाकडून देण्यात आली. या उद्यानाला ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कांदळवन उद्यान’ असे नाव देण्याची मागणी आ. संजय उपाध्याय यांनी केली असून यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
गोराई येथे स्थित असलेले कांदळवन उद्यान 8 हेक्टरच्या खारफुटी परिसंस्थेमध्ये 0.6675 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. यासाठी 33.43 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश खारफुटी आणि किनारी परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या महत्त्वपूर्ण जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी कक्षाच्या अथक प्रयत्नांतून कांदळवन उद्यान विकसित करण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या समर्पित कार्यानंतर, हे उद्यान लवकरच मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल. यामुळे खारफुटी परिसंस्थेच्या समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेण्याची व ती समजून घेण्याची एक अनोखी संधी मिळणार असल्याचे आ. संजय उपाध्याय यांनी सांगितले.
निसर्ग माहिती केंद्र : ही एक अत्याधुनिक, दोन मजली इमारत असून, यामध्ये छतावरील रेस्टॉरंट, निसर्ग-थीमवर आधारित भेटवस्तूंचे दुकान, कार्यशाळेच्या खोल्या, ग्रंथालय, दृकश्राव्य कक्ष आणि माहिती केंद्र यांचा समावेश आहे. हे केंद्र सौर ऊर्जा प्रणालीचाही वापर करेल, ज्याद्वारे त्याच्या गरजेच्या 80% विजेची निर्मिती केली जाईल.
बोर्डवॉक: खारफुटीच्या जंगलातून नागमोडी वळणे घेत जाणारा 740 मीटर लांबीचा लाकडी पादचारी मार्ग उभारण्यात आला आहे.
व्ह्यूइंग डेक : बोर्डवॉकच्या शेवटी खास तयार केलेला एक डेक, जिथून आजूबाजूच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते.
बर्ड वॉचिंग टॉवर : या परिसरात राहणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण करण्यासाठी उत्साही पक्षी निरीक्षकांसाठी 18मी. उंच मनोरा बांधण्यात आला आहे.