Gopichand Padalkar Dhangar Reservation pudhari
मुंबई

Gopichand Padalkar Dhangar Reservation: मी सत्तेत असलो तरी समाजाच्या पाठीशी खंबीर! पडळकरांनी सरकारलाच भरला सज्जड दम

Anirudha Sankpal

Gopichand Padalkar Dhangar Reservation: धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा सज्जड दम भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणि विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी धनगर समाजाच्या हक्कांच्या मागण्यांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. मी सत्तेत असलो तरी माझ्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत.

धनगर समाज सध्या अत्यंत शांततापूर्ण मार्गाने प्रशासनाला निवेदने देत असून, हा थेट समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. मात्र, दुर्दैवाने आजही धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. समाजात खासदार निवडून येत नाहीत आणि सत्तेत हवा तसा वाटा मिळत नाही. तसेच तहसीलदार किंवा इतर शासकीय पदांवरही समाजाचे प्रतिनिधित्व अपुरे असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. सध्या जमिनी सुपीक झाल्यामुळे मेंढपाळांना पारंपरिक मार्गांवर येण्यास मज्जाव केला जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. येत्या १८ तारखेला सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भातील सुनावणी होणार असून, सरकारने यात आपली ताकद लावून बाजू मांडली पाहिजे. या प्रकरणी न्यायालयात काही दगाफटका झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांना गोळा करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पडळकर यांनी दिला.

या पत्रकार परिषदेत त्यांनी काही प्रमुख ऐतिहासिक आणि सामाजिक मागण्याही मांडल्या. चर्चगेट रेल्वे स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे आणि तिथे त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तसेच इंग्रजांच्या विरोधात लढा देणारे शिंरोबा धनगर यांच्या योगदानाचा सन्मान करत कनेटिंग लिंकला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, संत बाळूमामा देवस्थानसाठी पंढरपूरच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा आणि या देवस्थान समितीचा अध्यक्ष नेहमी मेंढपाळ समाजातूनच असावा, असा आग्रह त्यांनी धरला.

यावेळी त्यांनी एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. स्पर्धा परीक्षा पेपर लीक प्रकरणातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली आहे. मात्र, काही लोक या मुद्द्यावरून आपली राजकीय प्रतिमा (इमेज बिल्ड) चमकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे लगावला. एकूणच धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि विविध मागण्यांवर पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धनगर समाजाची आश्वसनांचा बाजार संपवण्याची मागणी

गेल्या अनेक दशकांपासून केवळ राजकीय पोळ्या भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आता धनगर समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ‘केवळ पोकळ आश्वासने नकोत, तर आरक्षणाची थेट अंमलबजावणी करून दाखवा,’ असा निर्वाणीचा इशारा देत जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघासह विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाला थेट धारेवर धरले आहे. आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत शासनाने आता आरपारची भूमिका घ्यावी, अशी आक्रमक मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्यांचा धडाका :

  • ​सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत शासनाने अधिकृत व भक्कम बाजू मांडणे.

  • ​केंद्र व राज्य पातळीवर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.

  • ​हुतात्मा वीर शिक्रोबा धनगर यांचे नाव कनेक्टिंग लिंकला देणे.

  • ​मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला 'राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' असे नामकरण करणे.

  • ​लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा मंजूर करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT