Girija Raut allegations Pudhari
मुंबई

Girija Raut allegations : गिरिजा राऊत छळ प्रकरण: भोंदू बाबा फिरोज शेखला पोलीस कोठडी

गिरिजा यांनी केले पती, सासूसह सासरे, माजी खासदार विनायक राऊतांवर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Vinayak Raut daughter in law Girija Raut allegations : ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासू तसेच विनायक राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. शारीरिक व मानसिक छळ आणि अघोरी कृत्य प्रकरणातील आरोपी भोंदू बाबा फिरोज शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि. १२ जुलै) पोलीस कोठडी सुनावली. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पती, सासू आणि सासऱ्यांसह काही भोंदू बाबांवर गंभीर आरोप केले होते, ज्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गिरिजा राऊत यांनी केले गंभीर आरोप

तक्रारदार गिरिजा राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्न होऊनही मुलं होत नसल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी अपत्यप्राप्तीसाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा आधार घेतला. या अघोरी कृत्यांमध्ये त्यांना जबरदस्तीने सामील करून घेत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पती गीतेश राऊत, सासरे, माजी खासदार विनायक राऊत, सासू आणि भोंदू बाबा फिरोज शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

घटनास्थळावरून लिंबू, टाचण्या जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सिंधुदुर्ग येथील एका ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान स्वतः तक्रारदार गिरिजा राऊत हजर होत्या. त्यांनी भोंदू बाबा फिरोज शेख याला ओळखल्यानंतर पोलिसांनी फिरोज शेख याला तात्काळ अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून अघोरी कृत्यांसाठी वापरण्यात येणारे लिंबू, टाचण्या आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.

न्यायालयात काय घडले?

अटक करण्यात आलेला भोंदू बाबा फिरोज शेख याला आज ठाण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या अघोरी कृत्यामागे आणखी कोणाचा हात आहे का आणि इतर आरोपींचा यात काय सहभाग आहे, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी ६ दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी फिरोज शेख याला २ दिवसांची (१४ तारखेपर्यंत) पोलीस कोठडी मंजूर केली. त्याला १४ तारखेला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.

अघोरी कृत्य केले नसल्याचा बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद

अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पोलिसांच्या दाव्यांचा विरोध केला. वकिलांनी सांगितले की, "फिर्यादीत काही वर्षांपूर्वी ते त्या ठिकाणी गेल्याचा उल्लेख आहे, पण नेमकी तारीख किंवा वेळ स्पष्ट केलेली नाही. माझ्या अशिलाच्या वडिलांचा तो दर्गा असून ते तिथे केवळ देखभाल आणि पूजेसाठी असतात. दर्ग्यावर जाण्यास कुराणानुसार कोणतीही बंदी नाही. राऊत कुटुंब किंवा तक्रारदार तिथे गेले असता, त्यांना केवळ पाणी किंवा लिंबू पाणी दिले गेले असावे. यात कोणताही अघोरी प्रकार नाही." बचाव पक्षाने आरोपीला मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल कस्टडी (MCR) मिळण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT