गिरगाव : गिरगावतील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरील झावबावाडीत समूह पुनर्विकासाची पायाभरणी सुरू आहे. मात्र, पोकलेन मशिनच्या खोदकामामुळे परिसरातील इतर चाळी, इमारतींना हादरे बसत आहेत. यामुळे आधीच धोकादायक असलेल्या या वास्तूंना धोका वाढल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
येथे 65 मजल्यांचे दोन उतुंग टॉवर उभारण्यात येत आहेत. यासाठी 20,22 रहिवासी इमारती जमीनदोस्त करून मोकळ्या जागेत 7 ते 8 मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने पायाभरणी सुरू आहे. सकाळी सहा वाजल्यापासून पोकलेनद्वारे खड्डे मारायला सुरुवात होते. यामुळे नागरिकांची झोपमोड होते आहे. परिसरातील जुन्या चाळी इमारतींना अक्षरशः हादरे बसत आहेत.
या कंपनांमुळे घरातील साहित्य पडून नुकसान होत आहे. कुंड्यांमधील झाडेझुडपे थरथरत आहेत. या गंभीर समस्येबाबात स्थानिकांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह हाकेच्या अंतरावर असलेल्या सी विभाग जवळच्या म्हाडा कार्यालय आणि पालिका कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
पालिका सी विभागाचे दुय्यम अभियंता नवनीत जाधव यांनी गेल्या आठवड्यात पाहणी करतो असे सांगितले, मात्र अद्याप दखल घेतलेली नाही. सी 2 विभाग चंदनवाडी म्हाडा कार्यालयाच्या डेप्युटी इंजिनियर वैष्णवी कवाळे ह्यांनी बिल्डर, आर्किटेक्टला नोटीस पाठवल्याचे म्हंटल आहे. पण कारवाई करण्याचे काम वरिष्ठ आणि पालिका इमारत शहर विभाग अधिकाऱ्यांच्या हातात असल्याचे सांगून हातवर केले आहेत. लक्ष्मी नारायण इमारत क्र. 16, 8 येथील भाडेकरूंनी केलेल्या तक्रारीत कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हंटले आहे.
सुपरवायझरने केले हात वर
याबाबत पुनर्विकासाचे काम पाहणारे साईट सुपरवायझर कुणाल कोळंबकर यांना विचारणा केली असता, मी तुम्हाला याबाबत काही सांगू शकत नाही. मी फक्त परवानग्यांची काम पाहतो असे सांगत ठेकेदाराला विचारा असे सांगून वेळ मारून नेली.
पहाटेपासून सुरू होणाऱ्या खोदकामामुळे आणि पोकलेनच्या हादऱ्यांमुळे आमची झोप उडाली आहे. घरातील जड अवजड वस्तू पडून नुकसान होत आहे. आमची चाळ शंभर वर्षे जुनी असून यामुळे चाळीला धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडलीस तर त्याला सदर विकासक , पालिका , अधिकारी आणि म्हाडा प्रशासन जबाबदार असेल.निना लाड, रहिवासी