मुंबई : अरबी समुद्राला पावसाळ्यातही 4.80 मीटरपर्यंत लाटा उसळतात. पण रविवार 7 डिसेंबरला तब्बल 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या लाटा मध्यरात्री दीडच्या सुमारास उसळणार आहेत. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत कोणीही समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पावसाळ्याचे चार महिने अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. पण यंदा 4 ते 7 डिसेंबरला अरबी समुद्रात महाकाय लाटा उसळणार आहेत. गुरुवार 4 डिसेंबरला रात्री 11.52 वाजण्याच्या सुमारास समुद्रात महाकाय लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पाणी आले होते विशेष म्हणजे गिरगाव, जुहू, दादर, वेसावे वा अन्य चौपाट्याही पाण्याखाली गेल्या होत्या. मरीन ड्राईव्ह किनाऱ्यालाही महाकाय लाटा आपटल्यामुळे समुद्राचे पाणी मरीन ड्राइव्हवर फेकले गेले. शुक्रवारी रात्रीही अरबी समुद्रात महाकाय लाटा उसळल्या होत्या,मात्र गुरुवारपेक्षा या लाटांची उंची कमी होती.
दरम्यान शनिवार म्हणजेच शुक्रवार मध्यरात्रीपासून शनिवार पहाटेपर्यंत 5.3 मीटर उंचीच्या महाकाय लाटा उसळणार आहेत. रविवारी मध्यरात्रीही म्हणजे शनिवार मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या लाटांची उंची पावसाळ्यात उसळणाऱ्या लाटांपेक्षा जास्त असल्यामुळे विशेष सतर्कता बाळगण्यात आली आहे. मुंबईत मध्यरात्री काहीजण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जात असल्यामुळे त्यांनी हे फिरणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.