मुंबई

Mumbai theft news | रिक्षात विसरलेले लाखो रुपयांचे दागिने शोधून केले परत; घाटकोपर पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत अखेर रिक्षा चालकाचा शोध लावला आणि दागिन्यांची बॅग हस्तगत केली

पुढारी वृत्तसेवा

घाटकोपर: रिक्षात विसरलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोने महिलेला अथक प्रयत्नांतून मिळवून दिल्याने घाटकोपर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्पणा निकम या शनिवारी, २० जून रोजी अंधेरीवरून घाटकोपरच्या जागृती नगर मेट्रो स्थानकापर्यंत रिक्षाने प्रवास करत होत्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव, त्यांनी घरातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सर्व दागिने एका बॅगेत सोबत ठेवले होते. मात्र, जागृती नगर येथे उतरताना घाईत ती बॅग त्यांच्याकडून रिक्षातच विसरली गेली. घरी पोहोचल्यावर बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला, कारण हे सोने त्यांनी अनेक वर्षांच्या कष्टाच्या कमाईतून जमवले होते.

निकम यांनी तातडीने घाटकोपर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कर्तव्यावर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रिना लोहार यांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लोहार यांनी सहायक पोलीस आयुक्त शैलेश पासलवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव आणि पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

पोलीस शिपाई अजय अहिरे आणि सहायक पोलीस निरीक्षक रिना लोहार यांनी प्रवासाच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला रिक्षाचा क्रमांक अस्पष्ट दिसत होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत अखेर रिक्षा चालकाचा शोध लावला आणि दागिन्यांची बॅग हस्तगत केली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी हे सोने अर्पणा निकम यांना सुपूर्द केले.

आपले दागिने परत मिळाल्याने निकम कुटुंबाने घाटकोपर पोलिसांचे मनापासून आभार मानले. या कामगिरीबद्दल विशेषतः सहायक पोलीस निरीक्षक रिना लोहार आणि पोलीस शिपाई अजय अहिरे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT