Chhatrapati Sambhajinagar Crime: पोह्यात मीठ जास्त आहे म्हटल्याने गुंडाचा रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला

डोक्यात घातला सिमेंट गट्टू अन् लोखंडी तवा; आरोपीसह विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पोह्यात मीठ जास्त आहे, असे सांगणे रिक्षाचालकाला भलतेच महागात पडले. या कारणावरून संतप्त गुंडाने चालकाच्या डोक्यात लोखंडी तवा मारून आणि त्याच्या साथीदाराने सिमेंटचे गट्टू डोक्यात फेकून मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवारी (दि.२) रात्री २:३० वाजेच्या सुमारास घडली.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय संतोष शिंगारे (२५, रा. सुमनांजली हॉस्पिटलजवळ, सिडको) याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

फिर्यादी विजय प्रल्हाद चव्हाण (२३, रा. आनंदनगर, गल्ली नं. १४, गारखेडा) हे २ जून रोजी रात्री २.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे सुमनांजली हॉस्पिटलजवळील रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी करून थांबले होते. रात्रीच्या वेळी भूक लागल्याने चव्हाण हे जवळच असलेल्या एका ओळखीच्या हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी गेले. त्यांनी गाडी चालकाकडे पोहे मागितले. हातगाडी चालकाने पोहे दिल्यानंतर चव्हाण यांनी ते खाऊन पाहिले.

पोह्यांमध्ये मीठ जास्त असल्याचे जाणवल्याने त्यांनी, पोह्यात मीठ जास्त आहे, असे गाडीचालकाला सांगितले. याच कारणावरून तिथे उपस्थित असलेला आणि परिसरात आपली दादागिरी मिरवणारा गुन्हेगार अक्षय शिंगारे हा कमालीचा भडकला. तू मीठ जास्त कसे काय बोलला ? असे म्हणत त्याने नाश्त्याच्या गाडीवरील हँडल असलेला जड लोखंडी तवा उचलला आणि थेट विजय चव्हाण यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न

हा हल्ला एवढ्यावरच थांबला नाही, तर अक्षय शिंगारे याच्यासोबत असलेल्या विधिसंघर्षग्रस्त साथीदाराने हातात सिमेंटचा मोठा गट्टू घेतला. विजय चव्हाण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करत असताना या अल्पवयीन मुलाने त्यांच्या डोक्यात आणि हातावर दगडाने प्रहार केले. या अमानुष हल्ल्यामुळे विजय यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. या हल्ल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Knife Attack : पाण्याचा ग्लास देण्यास नकार देताच पोलिसावर चाकूहल्ला

मुकुंदवाडीत गुंडांचीच दहशत

अक्षय शिंगारे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. तो शस्त्र बाळगत असताना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अक्षयप्रमाणे अनेक सराईत गुन्हेगार टोळ्या चालवतात. भाईगिरी आणि दादागिरी करणाऱ्या या गुंडांच्या टोळ्यांची नागरिक व छोट्या व्यावसायिकांवर मोठी दहशत आहे. पोलिसांचा वचक नसल्याने गुंडगिरी फोफावली आहे. मुकुंदवाडी पोलिसांना या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news