घाटकोपर : घाटकोपर मधील प्रसिद्ध दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या केव्हीके शाळेत विद्यार्थ्यांना कँटीन च्या खाण्यातून विषबाधा झाल्याची घटना सोमवार दि १७ रोजी घडली आहे. सुमारे १५ ते २० विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली होती, मात्र सगळे विद्यार्थी आता स्थिर असून त्यांना उपचार करून सोडण्यात आले आहे. घाटकोपर पश्चिम मध्ये प्रसिद्ध असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक कँटीन आहे.
या कँटीन मध्ये बनविलेले वडापाव आणि समोसा पाव विद्यार्थ्यानी खाल्ले. यातील १५ ते वीस विद्यार्थ्यांना या मुळे अचानक पोटात दुखू लागले. तर सहा विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. या विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस, पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी कॅंटिन मधील साहित्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. मात्र तेलात कापूर सदृश्य वस्तू पडल्याने हे झाले असल्याचे आणी सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे शाळेचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कँटीन चालक सुंदर देवाडिगा च्या विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या अगोदर देखील या शाळेत मध्यान्ह भोजनात झुरळ आढळल्याने मोठा वाद झाला होता. आता पुन्हा अशा प्रकारे विषबाधेचे प्रकरण घडल्याने पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.