

घाटकोपर: दारूच्या नशेत कारने एकाला चिरडल्याची घटना आज (दि.१३) सकाळी साडेसहा वाजता घडली. या गाडीत तिघेजण होते. त्यातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यासोबत असलेला एक जण फरार झाला आहे अशी माहिती देण्यात येत आहे.
अपघातादरम्यान कारमधील तिघांनीही मद्यप्राशन केले होते. यातील आरोपी भाविका हिरेन दाबा ( वय 30 वर्षे ) ही गाडी चालवत होती. ती घाटकोपर पश्चिमेकडील एल बी एस मार्गावरून तिची मैत्रीण कोरम महेश गोरी हिला सोडण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकावरून असल्फा व्हिलेज येथे जात होती. दरम्यान हा अपघात झाला.
अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. यातील आरोपी महिला ही घाटकोपर येथील भानुशालीवाडी येथे राहत असून, ती गुजरात पासिंग असलेली ही कार ( गाडी नंबर GJ 15 CK 4411 ) ही चालवत होती. याच गाडीने असल्फा येथे जात असताना गाडी पालिका पाणी खाते येथे डिव्हायडर तोडून थेट फुटपाथवर चढली. तेथे झोपलेल्या एकाला चिरडून त्याला गंभीर जखमी केले आहे. याबाबत घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सध्या अपघातामधील गंभीर जखमी व्यक्ती हा बोलण्याच्या अवस्थेत नसून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. यातील चालक महिला आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय चाचणी घेण्यात येत आहे. या घटनेच्या या दोघीही दारूच्या नशेत होत्या असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. दरम्यान, यातील गंभीर जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो सध्या बेशुद्ध आहे. त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे असे घाटकोपर पोलिसांचे म्हणणे आहे.
गुजरात आरटीओची नोंदणी असलेल्या कारमध्ये अपघाताच्या वेळी 3 जण होते. मात्र अपघातानंतर काही क्षणातच एक पुरूष गाडीतून बाहेर पडून पोलीस येण्यापूर्वीच घटनास्थळावरून गायब झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे असेही सांगण्यात आले.
या कारमधील तिघेजण दारू पिऊन एलबीएस रोडवर गाडी चालवत होते. त्यामुळे गाडी चालवत असताना या महिलेचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट दुकानाच्या समोरच्या पायऱ्यांवर गेली. यात या महिलांना काहीही झाले नसून, ही बाब पादचाऱ्यांनी पोलिसांना आणि आपत्कालीन यंत्रणा यांना सांगितली. गाडीत दारूच्या बाटल्या आढळल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. आता फरार त्या फरार व्यक्तीचा शोध घेत आहेत.