मुंबई : एकांकी जीवन जगणाऱ्या शहनाज अनिस काझी (65) यांच्या हत्येने घाटकोपरमधील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या राहत्या घरात प्रवेश करुन अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात बेदम मारहाण करुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरु केला आहे.
शहनाज ही घाटकोपर येथील हिमालय सोसायटी परिसरातील मुकूंद सोसायटीच्या ए विंगच्या ए/तेरामध्ये राहत होती. तिच्या पतीने दोन लग्न केले होते. पतीच्या निधनानंतर ती गेल्या सात वर्षांपासून ती एकांकी जीवन जगत होती.
बुधवारी 26 नोव्हेंबरला तिची बहिण नेहा ऊर्फ मीना कोलगावकर हिने तिला कॉल केला होता, मात्र बरेच कॉल करुनही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या सायका रईस अन्सारी या महिलेला तिथे जाऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. सायका तिथे गेल्यानंतर तिला आतून फ्लॅट बंद असल्याचे दिसून आले.
तिने दरवाजा ठोठावून आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या पंडित यांच्या घरातून तिच्या फ्लॅटची चावी घेतली होती. दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर तिला शहनाज या रक्ताच्या थारोळयात बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. हा संशयास्पद वाटताच तिने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह घाटकोपर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु
शहनाज यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शहनाजच्या घरात प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात जड वस्तूने बेदम मारहाण करुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर घाटकोपर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.