117 year old woman DNA study | 117 वर्षीय महिलेच्या डीएनए अभ्यासातून उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य

DNA-study-117-year-old-woman-longevity-secret
117 year old woman DNA study | 117 वर्षीय महिलेच्या डीएनए अभ्यासातून उलगडले दीर्घायुष्याचे रहस्यPudhari File Photo
Published on
Updated on

माद्रिद : जगातील सर्वात वृद्ध व्यक्तींपैकी एक असलेल्या मारिया ब्रान्यास या 117 वर्षे जगल्या. दीर्घायुष्य लाभलेल्या मारिया यांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे दिसून आले आहे की, त्यांच्या दीर्घायुष्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरात असलेले अतिशय तरुण जनुके (एक्सेपश्नली यंग जीनोम) होते. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या मते, त्यांच्यातील दुर्मीळ जनुकीय बदल (रेअर जेनेटिक व्हेरिएंटस) दीर्घायुष्य, मजबूत रोगप्रतिकारशक्ती (इम्युन फंक्शन) आणि निरोगी हृदय व मेंदूशी जोडलेले होते.

ऑगस्ट 2024 मध्ये मारिया ब्रान्यास यांचे 117 व्या वर्षी निधन झाले. त्या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती होत्या. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी रक्त, लाळ, मूत्र आणि विष्ठा यांचे नमुने संशोधनासाठी दिले होते. बार्सिलोनामधील जोसेप कॅरेरास ल्युकेमिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाखालील चमूने या नमुन्यांचा अभ्यास केला. संशोधकांना आढळले की ब्रान्यास यांच्या पेशी त्यांच्या मूळ वयापेक्षा (क्रोनोलॉजिकल एज) खूपच तरुण वाटत होत्या किंवा तसे त्यांचे वर्तन होते. मारिया ब्रान्यास यांच्यामध्ये अनेक आरोग्यदायी आणि विशेष गोष्टी आढळल्या. त्यांच्या हृदयाचे आरोग्य उत्तम होते आणि दाहकतेची पातळी खूप कमी होती. त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि आतड्यांचे मायक्रोबायोम दोन्ही तरुण लोकांसारखे होते. त्यांच्यात ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ आणि ट्रायग्लिसराइडस्ची पातळी खूप कमी होती, तर ‘गुड कोलेस्ट्रॉल’ची पातळी खूप जास्त होती.

त्यांच्यामध्ये दीर्घायुष्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हृदय-मेंदूच्या आरोग्याशी संबंधित दुर्मीळ जनुकीय बदल आढळले. शास्त्रज्ञांना ब्रान्यास यांच्या गुणसूत्रांच्या (क्रोमोझोम) टोकांवरील संरक्षक आवरण असलेल्या टेलिओमियर्समध्ये ‘मोठी झीज’ आढळली. टेलिओमियर्स लहान होणे हे जास्त मृत्यूच्या धोक्याशी जोडलेले आहे. परंतु, ब्रान्यास यांच्यासारख्या अत्यंत वृद्ध व्यक्तींमध्ये हे एक उपयुक्त बायोमार्कर नसल्याचे दिसून आले. संशोधकांनी एक गृहितक मांडले आहे की, त्यांच्या पेशींचे आयुष्य लहान झाल्यामुळे कदाचित कर्करोगाला वाढण्यास कधी संधीच मिळाली नसावी. या संशोधकांनी नमूद केले आहे की, या एका अपवादात्मक व्यक्तीच्या अभ्यासातून हे चित्र समोर येते की, अत्यंत प्रगत वय आणि खराब आरोग्य यांचा मूळतः एकमेकांशी संबंध नाही.

केवळ एका व्यक्तीवरील हे संशोधन मर्यादित असले तरी, या निष्कर्षांमुळे निरोगी वृद्धत्वासाठी बायोमार्कर आणि आयुष्य वाढवण्याच्या संभाव्य धोरणांना एक नवी दिशा मिळाली आहे. 100 वर्षे ओलांडणार्‍या लोकांच्या तुलनेत दीर्घायुषी लोकांचा अभ्यास करून, मानवी जीवनातील अंतिम मर्यादा (एक्सस्ट्रीम ह्युमन लाईफस्पॅन) कशामुळे शक्य होते, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा टप्पा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news