आचारसंहितेपूर्वी उरकणार गारगाई प्रकल्पाचे भूमिपूजन pudhari photo
मुंबई

Gargai water supply project : आचारसंहितेपूर्वी उरकणार गारगाई प्रकल्पाचे भूमिपूजन

निविदा प्रक्रिया राबवण्याचे सरकारचे निर्देश; बाधितांचे पुनर्वसन महापालिका करणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाचा मुहूर्त मुंबई महापालिका निवडणूक आचारसंहितेपूर्वी उरकण्याचे तोंडी निर्देश राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला मिळाले असल्याचे समजते. त्यामुळे तातडीने निविदा प्रक्रिया राबवून या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईकरांना भासणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासाठी राज्यातील सत्ताधारी भाजपा आग्रही आहे. मुंबईकरांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे त्याचे भूमिपूजन मुंबई महापालिका निवडणूक आचारसंहितेपूर्वी करण्यासाठी राज्य सरकारचा मुंबई महानगरपालिकेवर दबाव येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानेही गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या धरणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे. ही निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांमार्फत देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका ओघदे गावानजीक विकसित करण्यात येणार आहे. गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे व 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. त्यानंतर या धरणातील पाणी मुंबईत आणण्यासाठी अन्य पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार आहेत. प्रकल्पाच्या पर्यायी वनीकरणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ सुमारे सात 670 हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे.

90% परवानग्या मिळाल्या

गारगाई प्रकल्पाच्या कामाची सुरुवात डिसेंबर 2020 पूर्वी होणार होती. पण राज्य व केंद्र सरकारच्या परवानग्या न मिळाल्यामुळे हा प्रकल्प लांबला. मात्र आता या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 90 टक्के परवानग्या मिळाल्या आहेत. संकल्प चित्रे व आराखडेही तयार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे काही गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिकेने स्वीकारली असून प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन महापालिकेतर्फे केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT