मुंबई : गणपती आगमन होण्यास अद्याप महिना असला तरी आतापासूनच मुंबईतील बाजारपेठांत घरगुती गणेशमूर्ती सजावट साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. आकर्षक अशा पर्यावरणपूरक राजसिंहासन, मोर, अष्टविनायक मखराला ग्राहकांची पसंती असून लटकन, तोरण, गुलाबाचा पट्टा अशा सजावट साहित्यालाही मोठी मागणी आहे. मखर व लटकनच्या दरात यंदा सुमारे 5 ते 7 टक्के वाढ झाली असल्याचे दादर येथील विक्रेत्यांनी सांगितले. एकंदरीत, दादर, लालबाग, मंगलदास, भुलेश्वर या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे.
दरवर्षी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या बाप्पांचे आगमन सर्रास सप्टेंबरला होते. मात्र; यंदा बाप्पाचे आगमन 27 ऑगस्टला होणार आहे. गणेशोत्सवासाठी आतापासून विशेषत दादर, लालबाग, भुलेश्वर, लोहार चाळ, मस्जिद बंदर यांसह उपनगरातील बोरिवली, दहिसर, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड आदी ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने फुलू लागल्या आहेत. घरगुती गणेशमूर्ती मखराचे सजावट साहित्य 400 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्या थर्माकॉल मखरऐवजी इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची मागणी आहे. यावर्षी विठू माऊली, महालक्ष्मी देवी, शंकर, श्री स्वामी समर्थ, राज सिंहासन, मोर अशा रुपातील व राजमहल, राजमुद्रा, मोरपंख, बालाजी, गोल्डन टेम्पल अशा एक ना अनेक छोट्या व मोठया आकाराचे मखर बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे लाकडी मखर हे 1200 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत आहेत. मखरांबरोबरच विविध प्रकारची लटकन बाजारात उपलब्ध आहेत.
विविध लटकनच्या किंमती दीडशे रुपयांपासून ते 450 रुपयांपर्यंत आहेत. सहा फुटी लटकनचा दर हा 450 रुपये इतका आहे. तर, छोट्या लटकनच्या दोन नगाचा दर हा दीडशे रुपये इतका आहे.
तीन फुटांच्या तोरणाचा दर 350 रुपयांपासून ते 550 रुपयांपर्यंत, तर गुलाबाने भरलेला 6 फुटांचा आकर्षक असा पट्टा 1500 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
इकोफ्रेंडली मखर हे टिकाऊ व मजबूत असल्याने लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. थर्माकॉलचे प्रमाण कमी झाले आहे. आजअखेर सुमारे 20 टक्के ग्राहकांनी मखरचे बुकिंग केले आहे. कोकणातील सर्वाधिक ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. रंगांचे दर वाढल्याने मखराच्या किंमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दहीहंडीनंतर ग्राहक वाढतील. - संजय जाधव, मखर विक्रेते, दादर
यावर्षी लटकन, तोरण यांचे दर सुमारे 5 ते 7 टक्क्यांनी वाढले आहेत. पण; विक्रीवर त्याचा परिणाम झालेला नाही. दहीहंडीनंतर सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहक येतील.संदेश दबडे, सजावट साहित्य विक्रेते